नागपूर : आतापर्यंत राज्यातील ११४ मोठय़ा मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली असून येणाऱ्या काळात राज्यातील पाचशेपेक्षा अधिक मंदिरात  वस्त्रसंहिता लागू होईल. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी शनिवारी नागपुरात दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घनवट म्हणाले, जळगाव, अकोला, धुळे, नागपूर, नाशिक, अमरावती, अहिल्यानगर (अहमदनगर) यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे.  मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील १८ मंदिरांचा यात समावेश आहे.  २०२० मध्ये राज्य शासनाने मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये वस्त्रसंहिता लागू केली. यामध्ये  भडक रंगांचे कपडे यांवर बंदी घालण्यात आली आहे. ही वस्त्रसंहिता लागू करण्यामागे जनमानसांत शासकीय प्रतिमा बिघडू नये, हा सरकारचा हेतू

होता. त्याचप्रमाणे देशातील अनेक मंदिरे, गुरुद्वारा, चर्च, मशिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे, खाजगी आस्थापने, शाळा-महाविद्यालय, न्यायालय, पोलीस आदी सर्वच क्षेत्रांत वस्त्रसंहिता लागू आहे. म्हणूनच मंदिरांमध्येही वस्त्रसंहिता असावी, ही आमची मागणी आहे.

सरकारला लवकरच प्रस्ताव

हा केवळ प्रारंभ असून राज्यातील छोटय़ा मंदिरांसह सर्व मोठय़ा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्याबाबत राज्य सरकारला प्रस्ताव देणार आहोत. विदर्भातील शेगाव, माहुर, कोराडी, रामटेक या मोठय़ा मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यात यावी याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे. दिवाळीपर्यंत एक हजारपेक्षा जास्त मंदिरात वस्त्रसंहिता लागू केली जाईल, असेही घनवटे यांनी सांगतले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dress code in 114 temples in the state maharashtra temple federation claims ysh