लोकसत्ता टीम
भंडारा: दृश्यम चित्रपटात ज्याप्रमाणे हत्या करणारा कोण हे पोलिसांना कळते, त्याला ताब्यात घेवून कसून चौकशीही केली जाते, हत्या करणाऱ्याने प्रेत कुठे पुरले हे ही कळते मात्र शेवट पर्यंत पोलिसांना मृतदेहाचा शोध घेता येत नाही . या चित्रपटाच्या कथानकाला साजेसा प्रकार भंडारा जिल्ह्यात नुकताच उघडकीस आला आहे.
तुमसर तालुक्यातील कवलेवाडा येथील घरकाम अर्चनाची हत्या करून तिचा मृतदेह चिखला खान परिसरात पुरल्याचे प्रकरण तब्बल चार वर्षांनी २५ मे रोजी उघडकीस आले होते. त्या प्रकरणात अर्चना माणिक राऊत (२३) हिच्या सुनियोजित हत्येच्या संशयावरून संजय चित्तरंजन बोरकर (४७), राजकुमार उर्फ राजु चितरंजन बोरकर (५०) दोघेही रा. नेहरू वार्ड, कवलेवाडा व धरम फागु सयाम (४२),रा. मोहगाव टोला या तिघांना गोबरवाही पोलिसांनी २५ मे रोजी अटक करण्यात आली होती.
हेही वाचा… भंडारा: आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या शास्त्रीनगर येथील बुकीला अटक
एका साक्षदाराच्या गुपित वक्तव्यावरून अर्चनाच्या हत्येचे गूढ उघडकीस आले होते. त्या संदर्भात आरोपींना तुमसर न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज रोजी संपुष्टात येणार आहे. मात्र अर्चनाच्या मृतदेहाचा थांगपत्ता अजून पर्यंत पोलिसांना लागलेला नसल्याने भंडाऱ्यात दृश्यम चित्रपटाची पूनरावृत्ती होणार का? अशा चर्चेचा उधाण आले आहे.
हेही वाचा… नागपूर, मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी; जाणून घ्या कोणती गाडी रद्द
आज ३१ मे रोजी आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून गोबरवाही पोलिसांना न्यायालय चौकशीच्या बाबतीत मुदत वाढ करते की आरोपींची रवानगी कारागृहात करते? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. गोबरवाही पोलीस हद्दीत २०१९ रोजी अर्चना कामाला गेली असता आरोपी बोरकर बंधू यांच्या घरून अचानक बेपत्ता झाली होती. तिची हत्या करून आरोपींनी मृतदेह चिखला खाणीच्या प्रतिबंधित परिसरात पुरल्याची माहिती तब्बल चार वर्षांनी घटनेच्या एकमेव साक्षदाराने जिल्हा पोलिसांना दिली होती.
अर्चना बेपत्ता होणे, तिच्या शेवटच्या क्षणांची साक्ष देणाऱ्या पुराव्यांकडे तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष करणे, चार वर्षांनी प्रकरण उघडकीस येणे, मृतदेहाची शोध, त्यातून आरोपींमार्फत पोलिसांची दिशाभूल, पोलिसांच्या हाती नैराश्य, स्थानिकांचा रोष अशा अनेक प्रश्नांना पूर्ण विराम लावणारी अर्चनाचाच अद्याप बेपत्ता ग्राह्य धरली जात आहे. मात्र आता सर्वांच्या नजरा तुमसर न्यायालयाकडे वळल्या आहेत. आरोपींची रवानगी जिल्हा कारागृहात झाल्यास प्रकरण पुन्हा थंड बस्त्यात पडून आरोपीचा मार्ग मोकळा करण्यास पूरक ठरणार आहे. या सर्व प्रकारात गोबरवाहीचे तत्कालीन अधिकारी आणि पोलीस अधीक्षक भंडारा यांच्या प्रेस नोट मध्ये नमूद बाबी पोलिसांच्याच अंगलोट येणार असल्याचे भासत आहे.
हत्येचे कारण पोलिसांनी दडपले?
भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र हत्या नेमकी का? कशी? याबाबत साधा उल्लेखही करण्याचे पोलीस टाळत आहे. अर्चनाशी अनैसर्गिक कृत्य घडले असावे आणि त्यातूनच पुरावे नष्ट करण्याचा एकमेव संशय आरोपींना भोवला असल्याचे समजून येत आहे.