नागपूर : भूगर्भात खनिजाचा शोध घेताना ते नेमके कुठे आणि किती प्रमाणात आहे यासंदर्भातील इत्यंभूत माहिती संकलित करणारे ड्रोन एका खासगी कंपनीने विकसित केले असून त्याचा वापर विदर्भातील सरकारी व खासगी क्षेत्रातील खाण व्यावयासिक करीत आहेत.
इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये लागलेल्या विज्ञान प्रदर्शनात या कंपनीचे दालन असून त्यात या ड्रोनच्या कार्यप्रमाणालीची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. ‘प्रिम्स’ हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ज्या भागात खनिज असल्याचाा अंदाज आहे, तेथे ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते. या माध्यमातून गोळा करण्यात आलेल्या माहितीचे विश्लेषण करून संबधित भागात खनिज आहे किंवा नाही किंवा असेल तर ते किती प्रमाणात उपलब्ध आहे याचा अंदाज येतो.
हेही वाचा >>> विज्ञान काँग्रेस अन् हळदी कुंकवाचा काय संबंध? शहरातील पुरोगामी मान्यवरांचा सवाल
पूर्वी सरकारी यंत्रणा किंवा खासगी उद्योजकांकडून खनिज असल्याच्या प्राथिमक माहितीवरून उत्खनन केले जायचे. यात वेळ आणि पैसाही खर्च व्हायचा, अनेकदा अपेक्षित मात्रेत खनिज उपलब्ध होत नसल्याने वरील सर्व प्रयत्न निरर्थक ठरत असत. हे लक्षात घेऊन कंपनीने नवे तंत्रज्ञान विकसित केले. त्याचा वापर आता खाण क्षेत्रात केला जात आहे. नागपूर जिल्ह्यातील काही खासगी कोळसा उद्योजक तसेच खनिकर्म महामंडळाकडूनही याचा वापर केला जात असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली. या शिवाय खाणीवर देखरेखीसाठीही ही यंत्रणा वापरली जाते, असेही स्पष्ट करण्यात आले.