नागपूर : नाकाद्वारे दिलेले औषध थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचत औषधीयुक्त ‘नॅनो पार्टिकल्स’ आता जीवघेण्या ‘ब्रेन ट्युमर’ला भेदणार आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या औषधी निर्माणशास्त्र विभागातील संशोधकांनी कर्करोग या जीवघेण्या आजारावर कोठेही शक्य होईल, अशी उपचाराची नवीन पद्धत शोधून काढली आहे. उपचाराच्या नवीन पद्धतीमुळे कर्करोगाने ग्रस्त असलेल्या अनेक रुग्णांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
औषधी निर्माणशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. विणा शैलेंद्र बेलगमवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सागर त्रिवेदी यांनी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या ‘इन्स्पायर फेलोशिप’मधून समाजासाठी अत्यंत उपयोगी असलेले हे नाविन्यपूर्ण संशोधन केले आहे. प्रचलित उपचार पद्धतीनुसार कॅन्सर रुग्णांना किमोथेरपी शिवाय पर्याय नाही. किमोथेरपीद्वारे औषधी रुग्णांना रक्तभिसरणाच्या माध्यमातून दिली जाते. या प्रचलित थेरपीमुळे रुग्णांच्या इतर अवयवावर विपरीत परिणाम होण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे संशोधकांनी रक्ताला टाळत न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूमध्ये औषध पोहोचेल अशी उपचाराची नवीन पद्धत संशोधनातून शोधून काढली आहे. ‘नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ असे या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीला नाव देण्यात आले आहे.
स्प्रेद्वारे नाकावाटे औषधीतील नॅनो पार्टिकल्स न्यूरान्सच्या माध्यमातून थेट मेंदूतील गाठीपर्यंत पोहोचेल. या नवीन उपचार पद्धतीत औषधी मेंदूतील गाठींपर्यंत पोहोचत असताना रक्ताचा अडथळा होणार नाही, याची दक्षता देखील घेण्यात आली आहे. शरीराच्या इतर भागापर्यंत औषध पोहोचणार नसल्याने अन्य अवयवांना इजा पोहोचण्याची शक्यता कमी होणार आहे. नवीन पद्धत ग्लायो ब्लास्टोमा मल्टीमार्म (जीबीएम)- ग्रेड ४ मधील ब्रेन ट्युमर झालेल्या रुग्णांवर देखील नवीन औषधोपचार पद्धत वापरता येणार आहे. अनेकदा रुग्णांना केमोथेरेपी अथवा प्रचलित पद्धतीनुसार औषधोपचार करण्यासाठी रुग्णालयात भरती व्हावे लागते. या नवीन पद्धतीनुसार रुग्णालयात अथवा कोठेही स्प्रेच्या माध्यमातून वैद्यकीय मार्गदर्शनाखाली औषधोपचार घेणे सुलभ होणार आहे. त्यामुळे रुग्णांचा वेळ तसेच पैशाची बचत देखील होणार आहे. संशोधकांना प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे (भाप्रसे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे, औषधी निर्माणशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रशांत पुराणिक यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
संशोधनासाठी दोन स्वामित्व हक्क
‘ब्रेन ट्युमर’वरील आजारासाठी शोधून काढलेल्या ‘नोवेल टार्गेटेड ड्रग डिलिव्हरी सिस्टीम’ या नवीन प्रकारच्या उपचार पद्धतीसाठी औषधी निर्माणशास्त्र विभागातील डॉ. विणा बेलगमवार व डॉ. सागर त्रिवेदी यांना दोन स्वामित्व हक्क प्राप्त झाले आहे. या उपचार पद्धतीबाबत डॉ. सागर त्रिवेदी यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे १२ संशोधन पेपर तर ५ बुक चाप्टर प्रसिद्ध झाले आहे.
इटली येथे प्रेझेंटेशन
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने प्राप्त झालेल्या एसईआरबीमधून डॉ. सागर त्रिवेदी यांनी इटली येथील बोलोनिया येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत या संशोधनाबाबत प्रेझेंटेशन सादर केले आहे.
जैव-सक्रिय घटकांची मदत
या उपचार पद्धतीमध्ये निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करीत जैव घटकांची मदत घेण्यात आली आहे. त्यामुळे नैसर्गिक घटकांचा वापर करून कॅन्सरवर मात करणारी नवीन उपचार पद्धती शोधून काढली आहे. या संशोधन कार्यासाठी विद्यापीठाने वेळोवेळी निधी उपलब्ध करून देत मोठे सहकार्य केले आहे. डॉ. विणा बेलगमवार, प्राध्यापक, औषधी निर्माणशास्त्र विभाग.