लोकसत्ता टीम
नागपूर : प्रियकराने प्रेयसीला झटपट श्रीमंत होण्याचा कानमंत्र दिला. एमडी ड्रग्स निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या प्रयोगशाळेला घरातील एक खोली देण्यास सांगितले. प्रेयसीनेही कोट्यवधी रुपयांचा फायदा लक्षात घेता चक्क प्रियकराला घरातच प्रयोगशाळा सुरू करण्यात मदत केली.
नागपुरातील पाचपावली परिसरातील बाळाभाऊपेठीतील एका घरात एमडी बनविण्याची प्रयोगशाळा पोलिसांनी सील केली. त्या घरावर नोटीसही चिटकवली असून घराचा वापर करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. निमजे यांच्या घरी हा कारखाना सुरू होता.
आणखी वाचा-महायुतीच्या समन्वय बैठकीचे रवी राणांना निमंत्रण नाही, हे आहे कारण
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निमित गोयल, पाचपावलीचे ठाणेदार बाबुराव राऊत आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय), कस्टम विभाग नागपूरचे प्रमुख गौरव मेश्राम यांच्या पथकाने बाळाभाऊपेठेतील ड्रग्स बनविण्याच्या कारखान्यांवर छापा मारून जवळपास ७८ कोटींचे रसायन, साहित्य जप्त केले. चारही युवकांना अटक करून १४ ऑगस्टपर्यंत डीआरआय कोठडी मिळविण्यात आली. आकाश हारोडे, साहिल शेख, सुमित घोरमाडे आणि दिव्यांशू चक्रपाणी अशी कारखाना चालविणाऱ्या आरोपींची नावे आहेत.
चारही युवक शिक्षण घेत आहेत. युवकांच्या मागे कोण आहे, रसायन साहित्य कुठून आणले, खर्च कोणी केला, तयार पावडरचा साठा कुठे पाठविणार होते, पावडर तयार करण्याची माहिती कोणी दिली, याचा तपास डीआरआयचे पथक करीत आहे. अटकेतील युवक माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याची माहिती आहे. मात्र, मंगळवारपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. आकाश हारोडे याचे घरमालक असलेल्या तरुणीशी प्रेमसंबंध आहेत. दोघेही लवकरच लग्न करणार आहेत. त्याने तिला झटपट पैसा कमविण्यासाठी ड्रग्स तयार करण्याची युक्ती सुचवली. तिने प्रियकराला स्वतःचे घर भाड्याने दिले. त्यामुळे त्या तरुणीचीही चौकशी होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-मोठी बातमी! दहावी, बारावीच्या परीक्षा वेळापत्रकावर आक्षेप
निमजे होते टेलर
बाळाभाऊपेठ परिसर दाटीवाटीचा युवकांनी निमजे यांच्या घरी चार दिवसांपूर्वीच कारखाना सुरू केला होता. निमजे यांना तीन मुली आहेत. एक मुलगी ब्युटी पार्लरचे काम करते तर दोन लहान मुली शिक्षण घेत आहेत. निमजे हे कपडे शिकवण्याचे काम करत होते. तीन वर्षापूर्वी त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे त्यांना दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. त्यांच्या मोठ्या मुलीच्या ओळखीतून खोली भाड्याने देण्यात आली होती. या परिसरात मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत वर्दळ असायची. युवक कारने सामान आणत होते. नवीन भाडेकरू आहेत, म्हणून जवळपासचे फारसे लक्ष देत नव्हते. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
सर्व सोयींनी सुसज्ज प्रयोगशाळा, द्रव्याचे रुपांतर ड्रग्स पावडरमध्ये
एमडीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेली सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज असलेली एक छोटी प्रयोगशाळा उभारली. युवकांनी प्रथम संपूर्ण संच खरेदी केला आणि सेटअप तयार करून शंभर किलोंपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार करण्याची क्षमता असलेला कच्चा माल देखील मिळवला होता. द्रव स्वरूपात ५० किलोंपेक्षा अधिक मेफेड्रोन तयार केले होते. आणि त्यापासून पावडर स्वरुपात उत्पादन बाहेर आणणयासाठी पुढील प्रक्रिया सुरू होती.
© The Indian Express (P) Ltd