भंडारा : भंडारा बसस्थानक परिसरात छुप्या मार्गाने मोठ्या प्रमाणात ड्रग्स-गांजाची विक्री होत असून त्यामुळे परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून अनुचित प्रकार वारंवार घडत असतात. हाकेच्या अंतरावर असणाऱ्या पोलीस विभागाने याकडे डोळेझाक केली आहे. आजही भंडारा बस स्थानकावर नशेत झिंगलेल्या एका तरुणाने एसटी बसवर दगडफेक करून बसची काच फोडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
पवनी डेपोची पवनीकडे जाणारी बस भंडारा बसस्थानकावरून निघाली. तोच एका अमली पदार्थांचे सेवन करून नशेत धुंद असलेल्या एका तरुणाने बस थांबविली. मात्र, बसमधे जागा नाही, तू मागच्या बसने ये असे वाहकाने सांगितले. मात्र मला का बसू दिले नाही म्हणून नशेत असलेल्या या तरुणाने बसचा पाठलाग करीत बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराबाहेर बसवर मागून दगडफेक केली. त्यामुळे एसटी बसची मागची काच फुटली. सुदैवाने प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. काच फुटताच चालकाने बस थांबवली आणि नशेत असलेल्या या तरुणाला टीसीकडे नेले. मात्र, टीसी भांडारकर यांनी पोलिसांना येईस्तोवर त्याला थांबवून न ठेवता समज देवून सोडून दिले. हा तरुण अंमली पदार्थांचे सेवन करून होता आणि वाहक व चालकांना जीवे मारण्याची धमकी देत होता असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अशा प्रकारे सोडून दिल्यामुळेच शहरात गुन्हेगारी वाढल्याचा चर्चा सुरू झाल्या.
हेही वाचा – बुलढाणा : ७ लाख हेक्टरवरील पेरण्या रखडल्या, अडीचशे गावांत टंचाई, जुलैमध्येही टँकर सुरूच
शहरात ड्रग्ज, गांजा सेवनाने तरुणाई मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळली आहे. त्यातूनच सध्या हत्यांचे सत्र सुरू आहे. असे असताना पोलीस प्रशासनाकडून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा – नागपूर: बदल्या झाल्या पण घटकप्रमुख कार्यमुक्त करेना! पोलीस अधिकारी संभ्रमात
बसस्थानक परिसरात पोलीस चौकीचे काय?
बसस्थानक परिसरात असलेली पोलीस चौकी शोभेची बाहुली झाली आहे. या चौकीत पोलीस कर्मचारी नसतात. त्यामुळे बसस्थानक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा अड्डा बनला आहे.