लोकसत्ता टीम

वर्धा : समाज माध्यमातून अनेक क्षण टिपल्या जातात. ती लोकांच्या रंजनाची साक्ष असते. परंतू, खून करण्याचा प्रकार सर्वांसमक्ष होत असूनही त्यात मध्यस्थी करण्याचा किंवा पोलिसांना त्वरित तक्रार करण्याचा प्रयत्न नं करता घटनेचा व्हिडिओ काढून मदत न करण्याचा विकृत प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. असाच प्रकार दुपारी चार वाजता घडल्याचे उजेडात आले आहे.

देवळीलगत सोनेगाव मार्गावर पोलीस वसाहती समोर ही निंदाजनक व क्रूर घटना घडली आहे. सोनेगाव आबाजी येथील विनोद डोमा भरणे (४५) हा काही कामासाठी देवळी येथे आला होता. काम आटोपून गावी परत जाण्यासाठी तो पोलीस वसाहत असलेल्या चौकात ऑटोची वाट बघत थांबला. तेव्हाच तिथे करण मोहिते या विस वर्षीय युवक येऊन धडकला. तो दारूच्या नशेतच होता. त्याने विनोदकडे पैश्याची मागणी केली. करण यास दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी गावातील कुणालाही पैसे मागत असे. त्याची ही सवय माहित असल्याने विनोदने पैसे देण्यास नकार दिला.

आणखी वाचा-पूर्व विदर्भाला अजूनही पावसाची प्रतिक्षा! उपराजधानीसह अनेक जिल्हे कोरडे

दोघात वाद झाला. यात पडते घेत विनोद हा कसाबसा बाहेर पडला. तेव्हा करण याने मोठा दगड विनोदच्या डोक्यात हाणला. तो खाली पडल्यावर परत त्याच दगडाने त्याला वारंवार ठेचणे सूरू ठेवले. असा प्राणघातक वार झाल्याने विनोदचा जागेवरच मृत्यू झाला. जाहीरपणे असा निर्घृण खून करण्यात आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. या मारहाणीत जवळच उभी मीरा शालिक मून या महिलेसपण दगड लागल्याने ती जखमी झाली. तर हा घृणास्पद व क्रूर प्रकार पाहून सुनीता वसंत ठाकरे ही महिला जागेवरच बेशुद्ध पडली. तिला त्वरित आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.

आणखी वाचा-केंद्रीय दळणवळण मंत्र्यांच्या शहरात ऑटोरिक्षा चालक संतप्त; या मागणीसाठी धरणे, निदर्शने…

दारुबाज युवकाने केलेला हा प्रकार लोकांना धस्तावून गेला आहे. पण घटना घडत असताना अनेक बघे निमूट उभे होते. एकही मदतीस धावला नाही. उलट काहींनी या घटनेचे चित्रीकरण करीत व्हिडिओ व्हायरल केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दारूबंदी असलेल्या व गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने दारूबंदीचे सत्य पुढे आले आहे. या थरारक घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस घटनास्थळी पोहचले. खूनी करण यास ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, माहिती मिळताच मृतक विनोद यांची पत्नी अर्चना भरणे ही पण घटनास्थळी धावत आली. हे दृष्य पाहून तिला पण भोवळ आली. या घटनेने जिल्ह्यातील दारूबंदी परत चर्चेत आली असून अशा घटनांवार अंकुश बसावा, अशी मागणी होत आहे.