बुलढाणा : एरवी वर्षभर नागरिकांनी गजबजणारी जिल्ह्यातील १३ तहसील कार्यालये सध्या ओस पडली आहे. कडक संपामुळे नागरिक व लाभार्थी तहसीलकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. दरम्यान यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले असून नागरिकांची कामे देखील खोळंबली आहे.
१४ मार्चपासून सुरू झालेल्या बेमुदत संपात १३ तहसीलमधील शत प्रतिशत कर्मचारी सहभागी झाली आहेत. त्यामुळे कार्यालयात तहसीलदार आणि तीन चार नायब तहसीलदार एवढेच कर्मचारी हजर आहे. पहिल्या दिवशी संपकऱ्यांच्या निदर्शने, घोषणाबाजी, धरणे यामुळे परिसर का होईना गजबज होती.
हेही वाचा… अकोला: अल्पवयीन मुलीला पळवून नेले, वारंवार अत्याचार करून मातृत्व लादले
कर्मचारी गायब
दरम्यान जुन्या पेंशनवरून कर्मचारी कारवाईच्या धमक्यांना न जुमानता संपावर गेले आहे. मात्र पहिला दिवस वगळला तर तेराही तहसीलमधील कर्मचारी कार्यालयापासून सुरक्षित अंतरावर राहत आहे. यामुळे आता नागरिकही तहसीलकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. बुलढाण्यासह सर्व तहसील ओस पडल्याचे दिसून आले. साहेब आहेत, पण फाईल तयार करणारे ‘बाबू’ च नसल्याने जाऊन काही फायदा नाही हे नागरिकांना उमजले आहे.
हेही वाचा… बुलढाणा: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार; आरोपीस वीस वर्षांचा सश्रम कारावास
पर्याय निष्फळ अन् खोळंबलेली कामे
दरम्यान मागील तीन दिवसांपासून तेरा तहसीलचे कामकाज ठप्प पडले असून ‘साहेब’ नुसतेच बसून आहे. नियमित कर्मचाऱ्यांऐवजी मंडळ अधिकारी अन तलाठी नेमण्याचा पर्याय फसलाय! याचे कारण ही मंडळी दहावीच्या परीक्षेत नियुक्त करण्यात आली आहे. बर आली तरी त्यांना कामाचे काही माहीत नाही, असे चित्र आहे. दुसरीकडे मार्च एन्ड अंतर्गतची वसुली, जमाबंदीचे काम ठप्प आहे. तहसीलदार यांच्याकडे तालुका दंडाधिकारी या नात्याने येणारी प्रतिबंधक कायद्यानुसार येणारी, आरसी १ ते ३ नुसार सुनावणीला येणारी शेतीविषयक प्रकरणे यांची सुनावणी बंद आहे. अन्न पुरवठा ची कारवाई ठप्प झाल्याने रेशन वितरण वांध्यात आले आहे. याशिवाय शेतकरी व लाभार्थ्यना आवश्यक दाखले, प्रमाणपत्र वितरण ठप्प झाले आहे. संजय गांधी निराधार, निवडणूक विषयक कामे खोळंबली आहे.