अमरावती : घरगुती वादातून पतीने पत्नीची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना ब्राह्मणवाडा थडी ठाण्याच्या हद्दीतील घाटलाडकी शेतशिवारात उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितू कचरू कासदे (४५) रा. कावला, मध्यप्रदेश असे मृत महिलेचे तर कचरू सुखराम कासदे (५०) रा. कावला, मध्यप्रदेश असे आरोपीचे नाव आहे.
कचरू व त्याची पत्नी नितू हे दोघे कामानिमित्त ब्राह्मणवाडा थडी परिसरात आले होते. रविवार, ३ सप्टेंबर रोजी दोघांनी चांदूरबाजार शहरातून बाजार केला. त्यानंतर दोघेही गावी जाण्यास निघाले. मात्र, काही कारणास्तव त्या दिवशी रात्री ते घाटलाडकी शिवारातील चारगड धरणाजवळ मुक्कामी राहिले. दरम्यान, सोमवारी सायंकाळी कचरू व नितू यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. या वादात कचरूने पत्नी नितूची दगडाने ठेचून हत्या केली. त्यानंतर त्याने शिवारातील एका शेतकऱ्याकडून मोबाइल घेऊन आपल्या कावला गावच्या सरपंचांशी संपर्क साधला. आपली पत्नी मरण पावली असून ती घाटलाडकी शिवारात पडून असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला. दरम्यान, सरपंचांनी याबाबत नितू यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानुसार कुटुंबीय नितू यांच्या शोधात घाटलाडकी शिवारात पोहोचले. मात्र, त्यांना नितूचा शोध लागला नाही. त्यानंतर त्यांनी ब्राह्मणवाडा थडी पोलिसांना माहिती दिली.
हेही वाचा – नागपूर : प्रियकर-प्रेयसीची गळफास घेऊन आत्महत्या
माहिती मिळताच ठाणेदार उल्हास राठोड यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी नितू यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या डोक्यावर दगड मारल्याची जखम होती. या प्रकरणी पोलिसांनी मृतक नितू यांचे भाऊ तुळशीराम सोमाजी बारस्कर (५५) यांच्या तक्रारीवरून आरोपी कचरूविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.