नागपूर : पैशाच्या वादातून एकाने मित्राच्या कानशिलावर पिस्तूल ताणली आणि गोळी झाडली. परंतु, ती गोळी पिस्तुलाच्या नळीत फसल्याने दैव बलवत्तर असलेल्या युवकाचा जीव वाचला. ही घटना कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोखारा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी रेहान अन्सारी असलम मियाजी (३०, बोखारा) असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांंनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीफ मोहम्मद रफिक अंसारी (३७), रा. एकता कॉलनी, यशोधरानगर आणि आरोपी रेहान अंसारी दोघेही जीवलग मित्र होते. दोघेही बेरोजगार असताना काहीतरी व्यवसाय थाटण्याचा विचार केला. दोघांनी थोडेफार कर्ज घेऊन भागीदारीत कोराडी नाका ते बोखारा रोडवर संजेरी ताज नावाने हॉटेल सुरू केले. हॉटेल चांगले सुरू असताना दोन महिन्यातच त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यामुळे आरोपीने ‘भागीदारी सोडून दे, मी तुझे पैसे परत देईन,’ असे शरीफला म्हटले. त्याच्या म्हणण्यानुसार शरीफने भागीदारी सोडली. मात्र, पैसे काही मिळाले नाही. तेव्हापासून त्यांच्यात पैशावरून वाद सुरू होता.
हेही वाचा : स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी नागपूर कराराची होळी
२५ सप्टेंबर रोजी रात्री शरीफ हा पत्नीसह आरोपीच्या घरी पैसे मागण्यासाठी गेला. मात्र, आरोपीने पैसे दिले नाही. त्याने घराच्या छतावरून खाली उतरून शरीफवर पिस्तूलने गोळी झाडली. मात्र, गोळी न सुटता ती खाली पडली. आरोपीने परत पिस्तुलातून दुसरी गोळी कानशिलावर झाडली. परंतु, गोळी पिस्तुलात अडकल्याने शरीफचा जीव वाचला. भयभीत झालेल्या शरीफच्या पत्नीने आरोपीला धक्का देत बाजूला केले.आरोपीने ठार मारण्याचा प्रयत्न करत ‘पैसे देत नाही, जे करायचे ते करून घे’ असे त्यास म्हटले. घाबरलेल्या रफिकने पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.