बुलढाणा: अपघात हा दुर्देवीच असतो. मात्र कधीकधी वाईटातून चांगले घडते .याचा अनुभव धाड पोलिसांना आला. तिथे झालेल्या अपघातामुळे तब्बल २० लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला.
बुलढाणाकडून येणार्या महिंद्रा बोलेरो पिक अप वाहन (एम.एच.२१ बि.एच.६२९३) या मालवाहू वाहनाने धाड येथील सहारा चौकात दुचाकीला धडक दिली. यामध्ये शेख ईसाक शेख लुकमान (५५, राहणार ढालसांवगी) जखमी झाले. धाडचे ठाणेदार मनिष गावंडे आणि सहकाऱ्यांनी जखमीला उपचारासाठी बुलढाणा येथे रवाना केले.
हेही वाचा… दिवाळीवर ‘स्वाईन फ्लू’चे सावट; नागपुरात तीन रुग्णांचा मृत्यू
वाहन चालक संदीप बाजीराव मोरे (वय ३३ रा.ओमसाई नगर जालना) आणि गणेश रामप्रसाद यादव ( वय २३ लक्कड कासेट जालना) या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलीसांनी मालवाहू वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल सह अन्य कंपनीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
हेही वाचा… अखेर दिवाळीपूर्वी दिवे उजळले, नागरिकांमध्ये हर्षोल्लास…
उपरोक्त गुटखा हा मध्यप्रदेशातील बऱ्हाणपुर येथुन जालना या ठिकाणी जात असल्याची माहिती समोर आली. आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर साखळी हाती लागण्याची शक्यता असुन वरीष्ठ पातळीवरुन या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपींवर विविध कलमानुसार गुन्हे दाखल केले असून आरोपींना विद्यमान न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. एएसआय मोरे, हवालदार रविंद्र बऱ्हाटे, जमादार संदीप कायंदे, भास्कर लवंगे, ईश्वर हावरे, राजु माळी, सोहेल शेख ईम्रान, शंकर वाघ यांनी ही कारवाई केली.