गोंदिया: गोंदिया शहरातील ४२ वॉर्डातील जवळपास सर्वच भागात नळातून घाण पाणी येत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. गोंदिया शहरातील गणेश नगर, बजरंग नगर, फुलचूर रोड, श्रीनगर, भीमनगर, मरारटोली, सिंधी कॉलनी, माताटोली अशा अनेक भागात गेल्या २ दिवसांपासून दूषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तक्रार करून देखील दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा विरोधात रोष व्यक्त केला जात आहे.
गोंदिया शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पाणीपुरवठा केला जातो आणि शहरातील बहुतांश लोकसंख्या नळांमधून येणाऱ्या गोड पाण्यावर अवलंबून आहे. शहरातील नागरिकांना शुद्ध आणि शास्वत पाणी पुरवठा व्हावा, यादृष्टीने वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम देखील शहरात केले आहे. मात्र, त्याचा देखील उपयोग नाही. नळांतून नेहमीच दूषित पाणी येण्याचा प्रकार सुरू असतो.
हेही वाचा… सरकारी कार्यालयात प्रीपेड वीज मीटर; केंद्र सरकारचे सुतोवाच
\गेल्या २ दिवसांपासून शहरातील गणेश नगर, बजरंग नगर, फुलचूर रोड, श्रीनगर, भीमनगर, मरारटोली, सिंधी कॉलनी, माताटोली आदी भागात दुषित आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे पाईपमध्ये चिखल साचून तेच पाणी नळाला येते. त्यामुळे असा प्रकार घडत असल्याचे मजिप्राचे म्हणणे आहे. पावसाळ्यात जलजन्य आजार बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची तक्रार करून देखील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दुरूस्तीचे काम सुरू
गोंदिया शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कुडवा येथील जल शुध्दीकरण केंद्रातील चैन मध्ये बिघाड झाला असल्याने माती युक्त पाण्याचा पुरवठा होत होता. तक्रारी आल्यानंतर त्यात त्वरित दुरूस्तीचे काम सुरू केले असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण चे अभियंता नितीन तंगडपल्लीवार यांनी ‘लोकसत्ता’सोबत बोलताना सांगितले.