नागपूर: प्रेमविवाहानंतर चार वर्षे सुखी संसार सुरू असताना कौटुंबिक कारणातून पती-पत्नीत वाद झाला. रागाच्या भरात पत्नी माहेरी गेली. तिच्या नातेवाईकांनी तिचे दुसरीकडे लग्न ठरवले. पत्नीच्या लग्नाची खबर मिळताच युवकाने धावपळ सुरू केली. भरोसा सेलमध्ये जाऊन मदत मागितली. पोलिसांनी मध्यस्थी करून युवकाच्या पत्नीचे लग्न रोखून त्याला दिलासा मिळवून दिला.
चैताली (२२, काल्पनिक नाव) हिच्या आईवडिलांचे निधन झाल्यामुळे ती हुडकेश्वर परिसरात मावशीकडे राहते. तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न झाले. काही महिन्यांत दीर निशांत (२२) याच्याशी सूत जुळले. दोघांचे प्रेमसंबंध वाढले. त्यांचे प्रेमप्रकरण दोन्ही कुटुंबीयांकडे पोहचले. मात्र, निशांत बेरोजगार असल्याने चैतालीच्या मावशीला लग्न मान्य नव्हते. त्यामुळे तिने लग्नास नकार दिला. चैताली आणि निशांतची ताटातूट झाली. तिच्या मोठ्या बहिणीने पुढाकार घेतला आणि मावशीच्या विरोधात जाऊन चैताली आणि निशांतचे लग्न लावून दिले. निशांतला एका कंपनीत नोकरी लागली. दोघांचाही सुखाने संसार सुरू झाला. यादरम्यान निशांतचे घरमालकाच्या मुलीशी इंस्टाग्रामवरून सूत जुळले.
हेही वाचा… उपराजधानीत गुन्हेगाराकडून तब्बल ९ पिस्तूल जप्त; मध्यप्रदेशातून पुरवठा
दोघांचे संबंध वाढले, पण काही दिवसांत चैतालीला त्यांच्या प्रेमसंबंधाची कुणकुण लागली. चैतालीने पतीची समजूत घातली. मात्र, ती मैत्री असल्याचे सांगून वेळ मारून नेत होता. चैतालीने पतीच्या भ्रमणध्वनीमधून त्या मुलीच्या संदेशाचे ‘स्क्रिनशॉट’ काढले आणि मुलीच्या वडिलांना दाखवले. त्यामुळे वडिलांनी निशांतला चोपले. त्यांना घरही सोडण्यास सांगितले. पत्नीमुळे प्रेमसंबंध तुटले आणि घरातूनही बाहेर काढल्याचा राग निशांतला होता. तेव्हापासून त्यांच्या संसारात मिठाचा खडा पडला.
मित्र-मैत्रिणींनी केला घोळ
निशांतचे वस्तीत राहणाऱ्या एका विवाहित महिलेशी पुन्हा सूत जुळले. तर चैतालीची एका युवकाशी फोनवरून मैत्री झाली. चैताली आणि तो युवक एकमेकांशी संदेशाची देवाणघेवाण करीत होते. तर निशांतचे विवाहित महिलेशी प्रेमसंबंध चैतालीने उघडकीस आणले तर त्याने चैतालीला मित्राबाबत विचारणा केली. त्यातून जुलै महिन्यात दोघांचे वाद झाले. निशांतने तिला मारहाण केल्याने ती माहेरी निघून गेली.
…अन् लग्न थांबले
चैताली माहेरी आल्यानंतर तिच्या मावशीने नातेवाईक युवकासोबत लग्न ठरवले. घरगुती साखरपुडा झाला आणि दिवाळीत लग्न ठरवले. ही बाब पती निशांतला कळली. त्याला पश्चाताप झाला. त्याने भरोसा सेलमध्ये धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी परिस्थिती समजून घेतली. प्रेमलता पाटील यांनी निशांत आणि चैतालीचे समुपदेशन केले. कुटुंबांनाही समुपदेशनासाठी बोलावले. दोघांच्याही कुटुंबीयांची समजूत घातली. चैतालीच्या होणाऱ्या पतीलाही सत्यता कळली. चैताली आणि त्या युवकाचे लग्न थांबले. आता निशांत आणि चैताली एकत्र राहण्यासाठी कुटुंबीयांशी चर्चा करून निर्णय घेणार आहेत.