लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर : नागपूरसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने वाढीव विद्यावेतनासह इतर मागण्यांसाठी २२ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजतापासून संप सुरू केला आहे. डॉक्टर संपावर गेल्यामुळे येथील रुग्णसेवा विस्कळीत होण्याचा धोका आहे.

नागपुरात निवासी डॉक्टरांनी गुरूवारी संध्याकाळपासून संप सुरू केला रूग्णालय परिसरात त्यांनी निदर्शने केली. नागपुरातील मेडिकल, मेयोसह राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मोठ्या संख्येने निवासी डॉक्टर कार्यरत आहे. येथील रुग्णसेवेचा भार प्रामुख्याने या डॉक्टरांवर असतो. त्यांनी विद्यावेतन मासिक ९० हजार रुपये करण्याची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्डला विद्यावेतन वाढवण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्यांनी पूर्वी आंदोलन स्थगित केले होते. परंतु सरकारने अद्यापही लेखी दिले नसल्याने निवासी डॉक्टर २२ फेब्रुवारीच्या संध्याकाळी ५ वाजतापासून संपावर गेले. त्यामुळे संध्याकाळनंतर राज्यातील सगळ्याच शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

आणखी वाचा-‘विनशर्त माफी मागतो, शेवटची संधी द्या’, राज्य शासन उच्च न्यायालयात असे का म्हणाले? काय आहे प्रकरण…

दरम्यान वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सगळ्याच महाविद्यालयातील अधिष्ठात्यांसह वैद्यकीय अधिक्षकांना रुग्ण सेवेवर परिणाम होऊ नये म्हणून आवश्यक उपाय करण्याचे आदेश दिले गेले आहे. त्यानुसार सगळ्याच वरिष्ठ डॉक्टरांच्या आता बाह्यरुग्ण सेवेसह वार्डातही सेवा लावण्यात येत आहे. सोबत सुट्टीवरील वरिष्ठ डॉक्टरांनाही प्रसंगी सेवेवर बोलावले जाणार आहे.

आपत्कालीन सेवा देणार

निवासी डॉक्टर संपावर गेले असले तरी पहिल्या टप्यात ते सगळ्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील आकस्मिक अपघात विभाग, अतिदक्षता विभागासह इतरही आपत्कालीन विभागातील अत्यवस्थ रुग्णांना सेवा देणार आहे. त्यामुळे तुर्तास खूपच प्रकृती खालवलेल्या रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

आणखी वाचा-अमरावती : चौकाचौकात मधमाशांचे थवे! गोंधळाचे वातावरण, दहा ते बारा जण जखमी, विद्यार्थ्यांवरही हल्‍ला

नॉन क्लिनिकल डॉक्टरांच्या सेवा लावणार

नागपुरातील मेडिकल, मेयो प्रशासनाकडून निवासी डॉक्टरांच्या संपादरम्यान मायक्रोबायलॉजी, न्यायवैद्यकशास्त्र विभागासह इतरही नॉन क्लिनिकल विभागातील निवासी डॉक्टरांच्या सेवा वेगवेगळ्या वार्डासह काही भागात लावल्या जाणार आहे. सोबत वैद्यकीय अधिक्षक कार्यालयात सेवेवर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याही सेवा विविध वार्डात लावण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

“निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृह, वाढीव विद्यावेतन, वेळेवर विद्यावेतन मिळावे यासाठी शासनाला निवेदन दिले. गेल्यावेळी शासनाच्या आश्वासनावरून संपही स्थगित केला होता. त्यानंतरही शासनाने अद्याप वाढीव विद्यावेतनाबाबत लेखी दिले नाही. शेवटी नाईलाजाने आंदोलन करावे लागत आहे.” -डॉ. शुभम महल्ले, अध्यक्ष, मार्ड, नागपूर (मेडिकल).

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to doctors on strike there is a risk of disruption of patient care in nagpur mnb 82 mrj