काटोल तालुक्यातील घटना

सततची नापिकी त्यातच यावर्षी पुन्हा निसर्गाची अवकृपा यामुळे  हातात आलेले कापूस पीक पावसाच्या अभावामुळे हातून गेल्याने काटोल तालुक्यातील हातला येथील मनोहर कृष्णाजी नागपुरे (४७) या शेतकऱ्याने आत्महत्या केली.

मनोहर नागपुरे यांच्याकडे अडीच एकर शेती होती. त्यांनी यंदा कापसाची  लागवड केली होती. मात्र, दुष्काळामुळे पीक वाळले. त्यामुळे मनोहर नागपुरे यांच्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले. मुलीचे लग्न तसेच दहावीत असलेल्या मुलाचे शिक्षण तसेच परिवाराची वर्षभराची पोटाची खळगी कशी भरावी याचाही प्रश्न त्यांना सतावत होता. शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते बाहेर निघाले. बराच वेळ होऊन घरी परत न आल्याने लोकांनी त्यांचा शोध घेतला असता ते घराच्या बाजूला असलेल्या नाल्याजवळ पडलेल्या अवस्थेत दिसून आले. मनोहर यांना तातडीने  रात्री ११.३० वाजताच्या सुमारास काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात आणल्या नंतर डॉक्टरांनी त्यांना नागपूर ला हलवण्यास सांगितले.  नागपूरला नेत असताना त्यांचा वाटेतच मृत्यू झाला.

जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा  -खा. तुमाने

शासनाने दुष्काळसदृश तालुक्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील केवळ तीनच तालुक्यांचा समावेश आहे. संपूर्ण जिल्ह्य़ातीलच शेतकरी संकटात असून शासनाने संपूर्ण नागपूर जिल्ह्य़ात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी शिवसेनाचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

नागपूर जिल्ह्य़ात ऑगस्ट महिन्याचा सुरुवातीपासूनच योग्य प्रमाणात पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कमी पावसामुळे जिल्ह्य़ातील विविध भागातील कापूस व सोयाबीनचे पीक जवळपास नष्टच झाले आहे. त्यातच नुकतेच शासनाने दुष्काळसदृश तालुक्यांची यादी जाहीर केली. त्यात नागपूर जिल्ह्य़ातील कळमेश्वर आणि काटोल व नरखेड अशा तीनच तालुक्यांचा समावेश केला आहे. परंतु वास्तविकतेत संपूर्ण नागपूर जिल्ह्य़ात दुष्काळसदृश परिस्थिती असून शेतकरी आस्मानी संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांना या त्रासातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संपूर्ण नागपूर जिल्ह्य़ात दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी तुमाने यांनी  केली आहे.