गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील तेलंगणा सीमेवरच्या अतिदुर्गम सिरोंचाला पुराचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. तेलंगणात अतिवृष्टी झाल्याने धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यामुळे मेडिगड्डा धरणात विसर्ग वाढला आहे. गोदावरी व प्राणहिता या दोन्ही प्रमुख नद्यांत जलस्तर वेगाने वाढल्याने तालुक्यात ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
मध्यरात्रीपर्यंत नदीकाठच्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरण्याचा धोका वर्तविला जात आहे. त्यामुळे तब्बल २० गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. तेलंगणातील येलमपल्ली व कडेम ही धरणे अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाली आहेत. येत्या २४ तासात आणखी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा… नागपूरमध्ये अंबाझरी तलावासह धरणेही तुडुंब, पावसाळी पर्यटनही जोरात
हेही वाचा… वर्धा : पाणीच पाणी चहूकडे! गर्भवती मातांची सुरक्षा, भोजन व्यवस्था प्राधान्याने
गोदावरी खोऱ्यात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे गोदावरी व प्राणहिता या दोन्ही नद्यांना महापूर येण्याची शक्यता आहे. नदीकाठच्या ४० गावांत प्रशासनाने बचावकार्य सुरु केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून सिरोंचा छोटा बाजार, पल्ली, नागरम, चितमपल्ली, रामकृष्णपूर, जनमपल्ली, मुगापूर, मेडीगुंटा, मृदकृष्णपूर, आयपेठा, पेंटीपाका, तुमनूर माल, चिंतरवेला, नाडीकुडा, अंकिसा, असरअल्ली, असरअल्ली, मुत्तापूर माल, सोमनपल्ली, रायगुडम, पेंडालया, सोमनूर या गावातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम सुरु आहे.