अमरावती : यंदा पावसाळ्यात पश्चिम विदर्भातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुबलक पाऊस झाल्याने सर्वच सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत. धरणांमध्ये २ हजार ८३२ दशलक्ष घनमीटर म्हणजे ९१ टक्के पाणीसाठा झाला असून वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. अमरावती विभागात लहान, मध्यम आणि मोठ्या स्वरूपाची ३११ धरणे आहेत. या धरणांची उपयुक्त जलसाठ्याची क्षमता सुमारे ३ हजार १०८ दलघमी एवढी आहे. त्यापैकी धरणांमध्ये आतापर्यंत सरासरी ९१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. गेल्यावर्षी या धरणांमध्ये ८५ टक्के पाणीसाठा होता. यंदा जुलै, ऑगस्टमधील पावसामुळे अप्पर वर्धा, अरुणावती, इसापूर, बेंबळा, काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा या मोठ्या प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे दरवर्षी शेतकऱ्यांना भेडसावणारा पाणीप्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विभागातील अनेक प्रमुख शहरांना धरणांमधून पिण्याचे पाणी पुरवण्यात येते. त्यामुळे शहरांनाही दिलासा मिळाला आहे.जुलैमध्ये झालेला दमदार पाऊस आणि ऑगस्टमध्ये संततधार पावसामुळे धरणांतील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली. पश्चिम विदर्भातील बहुतांश धरणांचे पाणलोट क्षेत्र हे सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. या डोंगरदऱ्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळला. अनेक सिंचन प्रकल्प ऑगस्टमध्येच भरली. त्यामुळे धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले. विभागात दोन्ही महिन्याची सरासरी पावसाने ओलांडली आहे.

हेही वाचा : विवाहित प्रेयसी अन्य युवकासोबत नको त्या अवस्थेत दिसल्याने प्रियकर चिडला

अप्पर वर्धा धरणातून अमरावती शहरासह मोर्शी, वरूड, लोणी, जरूड, हिवरखेड आणि ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. अमरावती शहर तर पूर्णपणे अप्पर वर्धा धरणाच्या पाणीसाठ्यावर विसंबून आहे. सद्यस्थितीत या धरणामध्ये ५४८.४२ दलघमी उपयुक्त पाणीसाठा असून पूर्ण संचय पातळी ही ३४२.५० मीटरवर पोहचली आहे. धरणाचा पाणीसाठा ९७.२३ टक्क्यांवर पोहचल्याने सध्या ५ दरवाजांमधून २४३ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.अकोला शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा आणि वान प्रकल्पातही मुबलक पाणीसाठा झाला आहे. काटेपूर्णा प्रकल्पात ८६.३५ दलघमी म्हणजे शंभर टक्के जलसाठा आहे, तर वान प्रकल्पात ७७.५७ दलघमी म्हणजे ९४.६६ टक्के पाणीसाठा झाला आहे.

यवतमाळ शहराला पेयजल पुरविणाऱ्या निळोना आणि चापडोह धरणामध्ये देखील पुरेशा प्रमाणात पाणीसाठा झाला असून पुसद शहरासाठी आधार ठरलेल्या पूस प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. सध्या या धरणामध्ये ९१.२६ दलघमी उपयुक्त जलसाठा आहे. धरणामधून १९.२१ घनमीटर प्रतिसेकंद विसर्ग सुरू आहे.वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी, मानोरा आणि २८ गावांना पेयजल पुरवणाऱ्या अरुणावती प्रकल्पातही पुरेसा जलसाठा झाला आहे.

हेही वाचा : सभागृहात कोणाचाही आवाज दाबला जाणार नाही ; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर

एकबुर्जी मध्यम प्रकल्पामध्ये ११.९७ दलघमी म्हणजे शंभर टक्के तर अरुणावती या मोठ्या प्रकल्पामध्ये १६९.६७ दलघमी (१०० टक्के) पाणीसाठा झाला आहे. अचलपूर-परतवाडा या शहरांना पाणी पुरवणाऱ्या चंद्रभागा मध्यम प्रकल्पात ३८.७७ दलघमी म्हणजे ९३.९९ टक्के पाणीसाठा झाला आहे.विभागातील ९ मोठ्या सिंचन प्रकल्पात सध्या १३२०.९६ दलघमी (९४.३६ टक्के), २७ मध्यम प्रकल्पांत ६५८.९५ दलघमी म्हणजे ९०.२८ टक्के तर २७५ लघू प्रकल्पांमध्ये ८५२.१० दलघमी म्हणजे ९०.२८ टक्के जलसाठा झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to heavy rain west vidarbhas water worries resolved amravati tmb 01