चंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीत रक्ताचा प्रचंड तुटवडा आहे. औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपुरात रक्ताची मागणी अधिक असल्याने आणि रक्तपेढीत रक्तसाठा कमी असल्याने शेकडो किलोमीटर दूर सोलापूर येथून ९० बँक रक्त मागविण्यात आले. यातूनच रक्तपेढीत रक्तसाठ्याचा प्रचंड तुडवडा दिसून येत आहे.
औद्योगिक जिल्हा अशी ओळख असलेल्या चंद्रपूरात मोठ्या संख्येने उद्योग, कारखाने आहेत. या उद्योगात आणि कारखान्यात सातत्याने अपघाताच्या घटना घडत असतात. तसेच ग्रामीण भागात आरोग्य सेवेचे अनेक प्रश्न असल्याने तेथील रूग्ण जिल्हा रूग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचाच आधार घेतात. तसेच रस्ते अपघात आणि इतरही रूग्णांचा मुख्य आधार जिल्हा रूग्णालय आहे. मात्र स्थानिक जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा मोठा तुडवडा असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ए पॉझीटीव्ह रक्तगटाचे रक्त जवळपास रक्तपेढीत नाहीच. त्यानंतर बी पॉझीटीव्ह, ओ पॉझीटीव्ह, ए निगेटीव्ह, बी निगेटीव्ह, एबी निगेटीव्ह, एबी पॉझीटीव्ह, ओ निगेटीव्ह या रक्त ग्रुपचा देखील तुटवडा आहे.
रक्त पेढीतील रक्ताचा प्रचंड तुटवडा बघता येथून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या पश्चिम महारष्ट्रातील सोलापूर येथून ९० बॅग रक्त येथे आणण्यात आले. सोलापूर येथून आणलेले रक्त ए व बी अशा दोन्ही ब्लडग्रुपचे रक्त होते. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या केवळ ११५ बँक रक्तसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वत्र रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. रविवारी शहरात निमा व रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर घेतले गेले. तिथे ८० बॅग रक्त गोळा करण्यात आले. तसेच अंचलेश्वर गेट येथेही एक रक्तदान शिबिर झाले. तिथे २९ बॅग रक्त गोळा करण्यात आले.
रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा बघता रक्ताची अधिकाधिक गरज असल्याचे डॉ.प्रेमचंद यांनी सांगितले. जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीतून दररोज किमान ४० ते ४५ बॅग रक्त गरजूंना द्यावे लागते. त्यामुळे रक्तसाठा उपलब्ध असला तरी रक्ताची मागणी अधिक असल्याने रक्ताचा साठा कमी होतो. त्यामुळेच सोलापूर येथून रक्त चंद्रपूर येथे मागवावे लागले अशीही माहिती डॉ.प्रेमचंद यांनी दिली. उन्हाळ्यात रक्ताची मागणी अधिक असते, त्यामुळे रक्तपेढीत रक्ताच्या बॅगचा साठा करून ठेवावा लागतो. त्यामुळेच रक्तदान शिबिराचे आयोजन केले जात आहे. सध्यातरी रक्तपेढीत ए पॉझीटीव्ह या रक्तगटाचे रक्त खूप कमी आहे अशीही माहिती डॉ.प्रेमचंद यांनी दिली.