लोकसत्ता टीम

नागपूर : शहर पोलीस आयुक्तालयाची सीमा वाढल्यामुळे शहरात गरोबा मैदान या नवीन पोलीस ठाण्याची स्थापना करण्यात येणार आहे. शहरातील ३६ वे पोलीस ठाणे असून लकडगंज आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीला विभागून नवीन पोलीस ठाण्याची सीमा ठरविण्यात येणार आहे.

पोलिसांवरील कामाचा ताण कमी करण्यासह गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलीस आयुक्तालयांतर्गत आणखी एका नवीन पोलीस स्टेशनला मंजुरी देण्यात आली आहे. गृहविभागाने बुधवारी याबाबतचे आदेश जारी केले. त्यानुसार लकडगंज आणि नंदनवन पोलीस स्टेशनचे विभाजन करुन नवीन गरोबा मैदान पोलीस स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे. या पोलीस ठाण्याच्या निर्मिती आणि अनावर्ती खर्च म्हणून ६५ लाख रुपयांची मंजुरी देण्यात आली आहे. या पोलीस ठाण्यात दोन पोलीस निरीक्षक, अन्य १४ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहे. त्यासाठी सध्या उपलब्ध असलेल्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांतूनच पोलिसांचा ताफा देण्यात येणार आहे.

गरोबा मैदान परिसर हा लकडगंज आणि नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत होता. मात्र, पोलिसांना जवळपास चार ते पाच किमीचा फेरा घेऊन घटनास्थळावर पोहचावे लागत होते. या परिसरात जवळपास दीड लाखांवर लोकसंख्या आहे. नागपूर ग्रामीण परिसरातील जवळपास ३५ गावे शहर आयुक्तालयात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे लोकसंख्यासह गुन्हेगारीसुद्धा वाढली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नवीन पोलीस ठाण्याची आवश्यकता होती. त्याचा पाठपुरावा करण्यात आल्यानंतर बुधवारी नवीन गरोबा मैदान पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे. शहरातील ३६ वे पोलीस ठाणे म्हणून गरोबा मैदान पोलीस ठाण्याची ओळख असणार आहे.

२०१४ ते २०१९ या काळात वाठोडा, पारडी आणि शांतीनगर या तीन पोलीस ठाण्याचा प्रस्ताव मार्गी लावला. त्यानंतर भांडेवाडी, गरोबा मैदान, रमना मारोती या तीन नवीन पोलीस ठाण्याचे प्रस्तावाला मंजुरी मिळाली होती. आता गरोबा मैदान पोलीस ठाण्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे पूर्व नागपुरातील गुन्हेगारीवर आळा बसेल. -कृष्णा खोपडे, आमदार,पूर्व नागपूर

Story img Loader