निसर्ग पर्यटनातून आदिवासींना लाभ
इच्छाशक्ती असली म्हणजे गावाचे रूप कसे पालटता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील आकोट वन्यजीव विभागातल्या शहानूरने घालून दिले आहे. काही वषार्ंपूर्वी बेरोजगारीच्या सावटाखाली जगत असलेले कोरकू बांधव आता ‘कोरकू तडका रेस्टॉरंट’मुळे पर्यटकांमध्ये चांगलेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यांच्या पारंपरिक अन्नाची चव दूरदेशी जाऊन पोहोचली आणि त्यांच्यावरील बेरोजगारीचे मळभही दूर झाले.
जेमतेम ८० कुटुंब असलेल्या या गावात अठराविश्वे दारिद्रय़ पाचवीला पुजलेले, पण वनखात्याने त्यांना मदतीचा हात दिला आणि त्याचे त्यांनी सोने केले. २०११-२०१२ मध्ये १ लाख, ३३ हजार, ७६९ रुपये एवढेच वार्षिक उत्पन्न असलेल्या या गावाने २०१४-१५ मध्ये ६ लाख, ९१ हजार, ५२१ रुपयांचा आकडा पार केला आहे. नरनाळा अभयारण्य, नरनाळा किल्ला आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या अलीकडच्या काळात चांगलीच वाढायला लागली आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या आकोट वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक उमेश वर्मा यांच्या पुढाकाराने आणि ग्राम विकास परिसर समितीच्या सहकार्याने निसर्ग पर्यटनातून त्यांनी हे लक्ष्य साध्य केले. यापूर्वी वर्षांतून एकदा नरनाळा महोत्सव साजरा होत होता, पण आदिवासींना होणारा त्याचा फायदा स्वयंसेवींनी हिसकावून घेतला. गेल्या तीन वर्षांत निधीअभावी महोत्सव होऊ शकला नाही, पण निसर्ग पर्यटनाने आदिवासींना फायदा मिळवून दिला. ‘कोरकू तडका रेस्टॉरंट’ ही सध्या शहानूरची खासियत आहे. इको हट, रेस्ट हाऊस, व्हीआयपी रेस्ट हाऊस, डॉर्मेटरीसह हे रेस्टॉरंट सज्ज आहे. परिसरात बगिचा, ब्रम्हा ब्रिज आणि व्हॅली क्रॉसिंगसारखे साहसी प्रकार वनखात्याच्या सहकार्याने आदिवासी तरुण पर्यटकांना उपलब्ध करून दिले आहेत. शहानूर ते बोरी असे ४० किलोमीटर आणि शहानूर ते वान अशी ७० किलोमीटरच्या उत्तम सफारीसाठी समितीने जिप्सी आणि टेम्पो वाहन उपलब्ध करून दिले आहे. वाघासह सर्वच वन्यप्राणी या सफारीत दर्शन देतात. शहानूर ते नरनाळा असा सात किलोमीटरचा ट्रेकिंगचा पर्यायसुद्धा शहानूरवासीयांनी उपलब्ध करून दिला आहे. या आदिवासीच्या ‘सोव्हीनिअर शॉप’मध्ये पर्यटकांची अक्षरश: झुंबड उडाली असते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा