लोकसत्ता टीम

अकोला: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील ७३४ खातेदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबित आहे. आधार प्रमाणीकरणाअभावी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती धोक्यात येऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी ५ जूनपर्यंत आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असल्याची माहिती सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक व्ही. आर. कहाळेकर यांनी दिली.

जिल्ह्यातील राष्ट्रीयिकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा सहकारी बँक व ग्रामीण बँक यांचेमार्फत ३५ हजार ६२७ कर्जखाती योजनेच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आले असून त्यापैकी २१ हजार २६६ खात्यांना आजपर्यंत विशिष्ट क्रमांक पोर्टल प्राप्त झाला आहे. त्यापैकी २० हजार ५२५ खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले. त्यातील २० हजार ०५० खात्यावरील ८७.६३ कोटीची कर्ज मुक्तीची रक्कम संबंधित खात्यावर जमा करण्यात आली आहे. उर्वरित खात्यांवरील रक्कम प्रक्रियेत आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणीकरण केले नाही, त्या शेतकऱ्यांसाठी ही शेवटची संधी आहे. त्यानंतर तक्रारीचा विचार केला जाणार नसल्याचे सहकारी संस्था विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.