लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूरः जून महिन्याचे बावीस दिवस लोटले. या बावीस दिवसांत केवळ ३८.५ मि.मी. पाऊस जिल्ह्यात झाला. त्याचा थेट परिणाम पेरणीवर झालेला दिसून येत आहे.

अनेक भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. जिल्ह्यात खरीप हंगामाचे क्षेत्र ४ लाख ५८ हजार ७२९ हेक्टर इतके आहे. त्यापैकी केवळ १४ हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे २.७२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. चांगला पाऊस पडेल या आशेवर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली. प्रारंभी काही भागात हजेरी लावणाऱ्या पावसाने उसंत घेतली. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. जमिनीत पेरलेले बियाणे करपले आणि बळीराजावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.

आणखी वाचा-धक्कादायक! हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ; गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात…

या जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ५८ हजार ७२९ हेक्टर इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रामुख्याने धानाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाते. त्यापाठोपाठ कापूस, सोयाबीन आणि तुरीचा समावेश आहे. कापसाचे क्षेत्र एक लाख ९० हजार हेक्टर, धान एक लाख ८५ हजार, सोयाबीन ७० हजार आणि तुरीचे पीक ३४ हजार हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते. सिंचनाची सुविधा असलेले शेतकरी पावसाळ्याआधीच पेरणीची कामे करतात, तर सिंचन सुविधा नसलेले शेतकरी पावसावर अवलंबून असतात.

नेहमीप्रमाणे यंदाही हवामान खात्याने जून महिन्यापासूनच चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिवती, कोरपना, राजुरा, गोंडपिपरी आणि अन्य भागात थोडाबहुत पाऊस झाला. आता पुन्हा पाऊस पडेल या आशेवर अनेक शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन आणि धानाची लागवड केली. सुरुवातीला थोड्याबहुत पडलेल्या पावसाने आता उसंत घेतली आहे.

आणखी वाचा-नागपूर : विद्यार्थ्यांना मेट्रोसाठी आता वाट बघावी लागणार नाही, सोमवारपासून…

वातावरणातही उकाडा वाढला. त्याचा परिणाम जमिनीत पेरलेले बियाणे करपले. त्यामुळे आता अनेक शेतकऱ्यांवर दुबारपेरणीचे संकट ओढावले आहे. प्रामुख्याने कोरपना, राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांवर हे संकट ओढावल्याचे चित्र दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान एक हजार १४२ मिमी आहे. वीस जूनपर्यंत केवळ ३८.५ मिमी पाऊस पडला. मागीलवर्षी जून महिन्यापर्यंत बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यावेळेस पेरणीचा टक्काही वाढला होता. यंदा केवळ २.७२ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पावसाअभावी जिल्ह्यातील पेरण्या खोळंबल्या आहेत.

पेरणी योग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. दुसरीकडे पावसाळी वातावरण तयार होते, आकाशात काळे ढग एकत्र येतात मात्र पुरेसा पाऊस पडत नसल्याने शेतकरी चिंतातुर आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून पावसात सातत्य नसल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आणखी वाचा-नागपूर : पार्टीचा बेत; चिकन, मासोळी शिजवण्यावरून वाद अन् डोक्यात घातला दगड…

जिल्ह्यात अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही. ७५ ते १०० मिमी पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. पेरणीची घाई केल्यास दुबारपेरणीचे संकट ओढावू शकते. त्यामुळे पुरेसा पाऊस पडल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. -शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर.

पीक पेरणी क्षेत्र
सोयाबीन १०७४ हेक्टर
कापूस ८२४६ हेक्टर
तूर ७२२ हेक्टर
भात २९४२ (आवत्या)
भात २१९७( पर्हे)
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to lack of rain sowing has failed farmers are worried rsj 74 mrj