अमरावती : ऑगस्टमध्ये पावसाने दिलेला खंड, काही भागात अपुरा पाऊस, यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. अमरावती विभागात रब्बी हंगामातील सरासरी लागवडीखालील क्षेत्र सुमारे ७.४६ लाख हेक्टर असून आतापर्यंत केवळ पाच टक्केच क्षेत्रात पेरणी होऊ शकलेली आहे. चांगला पाऊस झाल्यास खरिपातून काहीतरी हाती लागेल आणि दिवाळी आनंदात होईल, असे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाच्या अनियमिततेमुळे नुकसान सोसावे लागले. त्यानंतर परतीचा तरी चांगला पाऊस होईल आणि रब्बी पिकांची पेरणी करता येईल, या आशेवरील शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा पावसाने अपेक्षाभंग केला.
मोसमी पावसाच्या आगमनाला तीन आठवडे झालेला विलंब आणि ऑगस्टमधील पावसाच्या खंडाने पश्चिम विदर्भ यवतमाळ वगळता सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने रब्बी हंगामातील पेरणी कशी करावी, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. रब्बीचा हंगाम सुरु झालेला असताना आतापर्यंत फक्त ३६,४०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. काही भागात संरक्षित सिंचनाची सुविधा उपलब्ध असल्याने आता पेरणीला सुरुवात होत आहे. मात्र, जमिनीचे पुनर्भरण झालेले नसल्याने भूजल पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे विहिरीचे पाणी हंगामापर्यंत पुरणार की नाही, अशी शंका शेतकऱ्यांना आहे.
हेही वाचा : चंद्रपूर : वाघिणी पाठोपाठ वाघ जेरबंद
पश्चिम विदर्भात यंदाच्या रब्बी हंगामाकरिता ७ लाख ४५ हजार ८५१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. त्या तुलनेत सद्य:स्थितीत फक्त पाच टक्केच क्षेत्रात पेरणी झालेली आहे. आता सोयाबीनचा हंगाम शेवटाला आहे. त्यामुळे रब्बीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करीत आहे. प्रत्यक्षात जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने त्या भागात जिरायती हरभऱ्याची उगवणदेखील पुरेशी होत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
हेही वाचा : बुलढाणा शहरावर ९९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर!
अमरावती जिल्ह्यात १ लाख ४७ हजार ३५० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत सद्यस्थितीत २ हजार ८४८ हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ६० हजार ४०२ पैकी ४ हजार ७६० हेक्टर, अकोला १ लाख २१ हजार १०४ हेक्टरपैकी १० हजार २९०, वाशीम ८९ हजार ७८२ हेक्टरपैकी ४ हजार ४९७ आणि बुलडाणा जिल्ह्यात २ लाख २७ हजार २१३ हेक्टरच्या तुलनेत १२ हजार ८०५ हेक्टरमध्ये आतापर्यंत पेरणी झाली आहे. यंदाच्या रब्बीमध्ये सर्वाधिक ५.२७ लाख हेक्टरमध्ये हरभरा, १.८४ लाख हेक्टरमध्ये गहू, १७,३९१ ज्वारी १४,३२१ मका व ८३४ हेक्टरमध्ये करडईचे क्षेत्र राहण्याची शक्यता आहे.