नागपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलालगतच्या गावामध्ये आतापर्यंत वाघाच्या “त्या” सवयीने गावकरी त्रस्त होते. आता बिबट्याला देखील तीच सवय लागल्याने गावकरी मात्र दहशतीत आले आहेत. जिल्ह्यातील तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रांतर्गत आलेवाही, जीवनापूर, वाढोणा, कन्हाळगाव, गोविंदपुर, येनोली, सोनुली, गिरगाव, सावंगी, ओवाळा, या भागामध्ये वाघ, बिबट यांच्या हल्ल्यामध्ये सतत पाळीव जनावरे ठार होण्याच्या घटना ह्या नित्याच्याच झाल्या आहेत. आता मात्र काही दिवसापासून जीवनापूर, वाढोणा, सावंगी, कन्हाळगाव या गावामध्ये रात्रीला बिबट्याचे जाणेयेणे मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
हे बिबट जंगलालगतच्या गावांमधील गावकऱ्यांचा पाळीव जनावरांच्या गोठ्यातून शेळ्या उचलून नेणे, कोंबड्या घेऊन जात आहेत. प्रामुख्याने तळोधी वनपरिक्षेत्रात या घटना सातत्याने घडत आहेत. आज पहाटेच्या सुमारास तळोधी बाळापुर वनपरिक्षेत्रअंतर्गत येणाऱ्या व तळोधी बीटातील सावंगी या गावातील शेतकरी श्रीराम बिजाराम मलगाम यांच्या गोठ्यामध्ये बिबट शिरला. यावेळी बिबट्याने गोऱ्यावर हल्ला करून गोऱ्याला ठार केले व त्याच्यावर ताव मारून निघून गेला. श्रीराम मलगाम सकाळी उठल्यावर त्यांना हा प्रकार निदर्शनास आला. संबंधित घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. यावेळी वनविभागाचे तळोधी बीटाचे वनरक्षक संदीप चौधरी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. त्यानंतर या परिसरात कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी सावंगी येथील रतिराम रंधये यांच्या घरामध्ये शिरून बिबट्याने दोन शेळ्यांना ठार केले. त्यानंतर बिबट घरातच वर दडून बसला. त्या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाला चांगलीच कसरत करावी लागली.
हे ही वाचा…‘या’ गावचे दैवत आहे रावण… दसऱ्याच्या दिवशी दहन नव्हे पूजा; ग्रामस्थ म्हणतात…
या घटनेनंतर आज पुन्हा सावंगी गावातील गोठ्यात घुसून बिबट्याने गोरा ठार केल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर नियंत्रण करावे असे परिसरातील जनतेची मागणी आहे. गावातील घरात शिरायचे आणि गावकऱ्यांच्या पाळीव जनावराची शिकार करून आणि त्यावर ताव मारून परत जायचे, हे या परिसरात आता नित्याचे झाले आहे. जनावरे गोठयात नाही तर घरात ठेवायची का, असाही प्रश्न गावकरी करत आहेत. आतापर्यंत गावकरी वाघाच्या दहशतीत होते आणि आता बिबट्याच्या या सवयीमुळे गावकरी दहशतीत आले आहेत. वाघाच्या भीतीने शेतात जायचे नाही आणि आता बिबट्याच्या भीतीने जनावरे पण पाळायची नाहीत का, असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
© The Indian Express (P) Ltd