नागपूर : शहर पोलीस विभागाने येत्या २५ जानेवारीला ३ ते २१ किलोमीटर अंतराची अर्धमॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी नोंदणी शुल्क १ हजार ते ५०० रुपये आहे. मात्र, या स्पर्धेत सामान्य नागरिकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याने शहरातील प्रत्येक ठाणेदारांना ३०० अर्ज भरुन देण्याची सक्ती केल्याची चर्चा आहे. त्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर असून ठाणेदार मात्र, तिकीट विक्रीत व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहेत.
येत्या २५ जानेवारीला नागपूर पोलिसांची अर्धमॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत स्पर्धकांना जवळपास ७ लाख ८५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. पोलीस विभागाच्या शिवाजी स्टेडियमवरुन ही स्पर्धा सुरु होईल. अर्धमॅरेथॉनमध्ये ३ किमी, ५ किमी, १० किमी आणि २१ किमी असे अंतर पार करावे लागणार आहे. २१ किमी अंतरासाठी तब्बल ४ लाखांची बक्षिसे आहेत. तर १० किमी अंतरासाठी २ लाख ६० हजारांची बक्षिसे ठेवण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी ‘टायगर रन’ नावाने ही स्पर्धा ठेवली आहे.
हेही वाचा…प्रशासक नियुक्तीच्या भीतीपोटी युद्धपातळीवर मुलाखती, चंद्रपूर जिल्हा बँक नोकरभरती प्रकरण
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ५०० रुपये, ७०० रुपये आणि १ हजार रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी काही टक्के सूट देण्यात आली आहे. मात्र, सामान्य नागरिकांचा या स्पर्धेला अल्प प्रतिसाद आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रत्येक ठाणेदारांना ३०० अर्ज भरण्याचे टार्गेट दिले आहे. त्यामुळे ठाणेदारांनी डीबी पथक आणि गुप्तहेर विभागाला कामाला लावले आहे. नागरिकांना भेटा आणि त्यांच्याकडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरुन घ्या, असे आदेशच ठाणेदारांनी पोलीस कर्मचाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यातील अर्धेअधिक कर्मचारी मॅरेथॉन स्पर्धेचे अर्ज भरण्यात मग्न आहेत. याचा परिणाम पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावर होत आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गस्त आणि नाकाबंदीवरही होत आहे. शहरात चोरी, घरफोडी, हत्याकांड, प्राणघातक हल्ल्याच्या घटना आणि वाहनचोरी असे गुन्हे घडत आहेत. मॅरेथॉन स्पर्धेचे अर्ज भरण्यातच ठाणेदार व्यस्त असल्यामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अगदी वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे.
हेही वाचा…वाशीम जिल्ह्यात पीक लागवडीच्या नव्या वाटा; ‘या’ पिकाला मिळतोय चांगला भाव
पोलीस उपायुक्तांकडे जबाबदारी
शहरातील ठाणेदारांनी रोज किती अर्ज भरले आणि किती अर्जाचे पैसे जमा केले, याबाबत नियोजन करण्याची जबाबदारी एका पोलीस उपायुक्तांकडे दिली आहे. त्यामुळे दिवसातून पाच ते सात वेळा वॉकीटॉकीवर उपायुक्तांच्या अर्ज भरण्याबाबत आणि अर्जाची रक्कम जमा करण्याबाबत सूचना असतात. त्यामुळे प्रत्येक ठाणेदारांना रोज अर्ज भरल्याबाबत हिशोब सादर करावा लागत असल्याने ठाणेदारसुद्धा त्रस्त असल्याची चर्चा आहे.