लोकसत्ता प्रतिनिधी
नागपूर: घरात अठराविश्व दारिद्र्य त्यात आईचे आजारपण आणि बहिणीच्या शिक्षणासाठी १४ वर्षीय मुलीने घरातील चूल पेटविण्यासाठी थेट देहव्यापाराचा मार्ग पत्करला. मैत्रिणीच्या सांगण्यावरून ती स्वतःचे शरीर विक्री करून पैसे कमविण्यासाठी मजबूर झाली. पोलिसांनी वाठोड्यातील देहव्यापाराच्या अड्ड्यावर घातलेल्या छाप्यात त्या मुलीसह तिची मैत्रिण मिळून आली. तर पोलिसांनी दोन महिला दलालांसह तिघांना अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी टिना (काल्पनिक नाव) ही आठवीत शिकते. ती आईवडिल व लहान बहिणीसह अजनीत राहते. तिचे वडिल दारुडे असून आई धुणीभांडी करीत होती. मात्र, गेल्या काही महिन्यांपूर्वी तिच्या आईला दुर्धर आजाराने ग्रासले. त्यामुळे घरात खायला अन्नसुद्धा मिळणे कठिण झाले होते. त्यामुळे टिनाने स्वतःच कामावर जायचे ठरविले. तिची मैत्रिण प्रेरणासोबत ती ‘इव्हेंट’च्या कामावर जायला लागली. त्यामुळे घरातील चूल पेटत होती. मात्र, आईचा दवाखाना आणि औषधीचा खर्च भागत नव्हता.
हेही वाचा… मेट्रोच्या शंकरनगर स्थानकाचे नामकरण, शिवसेनेची मागणी काय?
प्रेरणाने तिला झटपट पैसे कमविण्यासाठी देहव्यापारात काही दिवस काम करण्याचा सल्ला दिला. तिने आरोपी महिला दलाल विद्या धनराज फुलझले (वाठोडा) आणि तिचा प्रियकर सुधाकर श्रीराम नरुले (आनंदनगर, हुडको कॉलनी) यांची भेट घालून दिली. विद्याने मैत्रिण सीमा सुधाकर सहारे (राऊत नगर,वाठोडा) हिच्यासोबत वाठोड्यात ‘सेक्स रॅकेट’ सुरु केले होते. सीमा आणि विद्या यांनी टिना आणि प्रेरणा या दोघींना देहव्यापारात ओढले. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मुलींचे आर्थिक आणि लैंगिक शोषण सुरु होते. सुधाकर हा आंबटशौकीन ग्राहक शोधायचा आणि दोन्ही मुलींना शारीरिक संबंधासाठी पाठवत होता. या ‘सेक्स रॅकेट’ची चर्चा वाठोड्यात होती, परंतु, वाठोडा पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे तेथे आतापर्यंत कारवाई झाली नव्हती.
गुन्हे शाखेने घातला छापा
वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राऊतनगरात गेल्या अनेक दिवासांपासून ‘सेक्स रॅकेट’ सुरु होते. याबाबत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांना माहिती मिळाली. मानवी तस्करी विरोधी पथकाच्या प्रमुख रेखा संकपाळ यांच्या पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. बुधवारी सापळा रचून विद्या, सीमा आणि सुधाकर यांना अटक केली. टिना आणि प्रेरणा या दोघींचीही देहव्यापाराच्या दलदलीतून सुटका करण्यात आली.