वाशिम: अनेक जण नोकरीवर लागले की आपले कुटुंब, समाज विसरून जात असल्याचे दिसून येते. परंतु वाशिम पोलीस दलात २००८ मध्ये लागल्या नंतर आपल्या सोबत गोर गरीबांचे पोर देखील नोकरीवर लागले पाहिजेत म्हणून जवळपास मागील दहा वर्षांपासून नोकरी सांभाळून मुलांना मोफत धडे देणाऱ्या प्रदीप बोडखे या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून नुकत्याच लागलेल्या अग्निवीर सैनिक भरतीत तब्बल १४ विद्यार्थी चमकले आहेत.
शेतकरी कुटुंबातील प्रदीप बोडखे याने पोलीस भरतीसाठी अपार कष्ट घेतले. आणि तो २००८ मध्ये वाशीम पोलीस दलात नोकरीला लागला. मात्र, नोकरी लागल्यानंतर २०१२ पासून त्याने नोकरी सांभाळून जिल्हा क्रीडा संकुल येथे पोलीस भरती, सैनिक भरतीची तयारी करणाऱ्या ग्रामीण भागातील गोर गरीब विद्यार्थ्यांना मोलाचे मोफत मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थ्यांचा कसून सराव घेऊन परीक्षा घेतल्या.
हेही वाचा… “पडळकरांसारखी चिल्लर व्यक्ती अजित पवारांना लांडगा म्हणत असेल, तर…”, काँग्रेस नेत्याचं विधान
हळू हळू विद्यार्थी वाढले आणि जिद्दीने प्रयत्न करू लागले. जवळपास मागील दहा वर्षांपासून प्रदीप बोडखे याने अनेक विद्यार्थ्यांना केलेल्या मार्गदर्शनामुळे २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पोलीस भरतीत जवळपास २५ विद्यार्थी लागले. त्यातच नुकताच जाहीर झालेल्या अग्निवीर सैनिक भरतीत तब्बल १४ विद्यार्थी निवडण्यात आले आहेत.