लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्धा : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. पण देणाऱ्याचा हेतूच जर शंकास्पद ठरविल्या जात असेल तर व्यथित होणार हे नक्की. हिंगणघाट येथेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून जोरदार आंदोलन झाले होते. पण शासनाने वर्ध्यात होणार असल्याची घोषणा केल्यानंतर भडका उडाला. आमदार समीर कुणावार यांनी तर राजीनामा देण्याचा इशारा देऊन टाकला होता.

शेवटी हे महाविद्यालय हिंगणघाट येथेच होणार अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय कुठे व्हावे, यातून वाद सूरू झाला. हे महाविद्यालय हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातच व्हावे म्हणून मागणी झाली. अन्य जागंचा शोध सूरू झाला. महसूल पेक्षा झूडपी वन जमीनच अधिक असल्याने प्रश्न सुटत नव्हता.

आणखी वाचा-चिंताजनक! गडचिरोलीत सहा महिन्यात हिवतापामुळे ५ मृत्यू

दरम्यान हिंगणघाट पुढे वेळा या गावातील जमिनीचा प्रस्ताव पुढे आला. या ठिकाणी बापूराव देशमुख सहकारी साखर कारखान्याची १८२ एकर जमीन मल कॉन्स्ट्रक्शनने १ मार्च २०२४ मध्ये विकत घेतली होती. त्यापैकी ४० एकर जागा केवळ एक रुपयात वैद्यकीय महाविद्यालयास दान देण्याची घोषणा या कंपनीने केली. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मात्र असे दान देण्यामागे स्वार्थ असल्याचा आरोप संघर्ष समिती तसेच विरोधी पक्षाने केला. तसेच दानदात्याने स्वतःच्या फायद्यासाठी जागा दान दिली असून येत आमदार समीर कुणावार यांचा यात सहभाग असल्याचा जाहीर आरोप केला.

दान देण्याने हेतूच प्रश्नांकित होत असल्याचे चित्र पाहून कंपनीच्या संचालकांनी आपली भूमिका आता जाहीर केली. दान देण्याच्या भूमिकेचे जनता स्वागत करेल अशी अपेक्षा होती. पण यानिमित्ताने आम्हास बदनाम करण्याचा नाहक प्रयत्न सूरू झाला. आमच्याबाबत चूकीची माहिती प्रसारित केल्या जात आहे. त्यामुळे आमच्या कुटुंबास मानसिक त्रास होत आहे. प्रतिष्ठा डागळत आहे. म्हणून आम्ही आमची जागा परत घेण्याचा निर्णय घेत आहे. तसे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. आता हिंगणघाट परिसरात सुयोग्य जागा शोधून लवकर महाविद्यालय सूरू व्हावे, अशी अपेक्षा मल कंपनीने व्यक्त केली.

आणखी वाचा-ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तिकीट घोटाळा: ठाकूर भावंडांना नेमका कुणाचा आशीर्वाद?

दानाची जागा शहरापासून दूर असल्याचा व रुग्णासाठी ती सोयीची नसल्याचा आरोपही संघर्ष समिती करते. त्यामुळे शहरातील रुग्णालय परिसरात उपलब्ध जागेवरच हे महाविद्यालय व्हावे, असा आग्रह धरल्या जातो. तर रुग्णालय परिसरात केवळ ९ एकर जागा उपलब्ध असून ती निकषात बसल्याचे कुणावार समर्थक सांगतात. तसेच वेळा येथील जागा दूर नसून केवळ चार किलोमीटर अंतरावर असल्याचे ते म्हणतात. तशी अधिकृत मोजणी झाली असल्याचा दावाही होतो. मात्र या आरोप प्रत्यरोपामुळे महाविद्यालय होणार की नाही अशी भीती जनतेत व्यक्त होवू लागली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to the allegations the donated 40 acres of land was demanded back pmd 64 mrj
Show comments