‘सेस’ रद्द करण्याची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य बाजारात शासनाने सेस लावण्याचा निर्णय घेतला असून त्याविरोधात मंगळवारी व्यापाऱ्यांनी बंद पुकारला. त्यामुळे आज येथील सर्व व्यवहार ठप्प होते.

होलसेल ग्रेनअ‍ॅण्ड सीडस् र्मचट असोसिएशन आणि दी चेम्बर्स ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड ट्रेड (सीएएमआयटी) यांनी बंदचे आवाहन केले होते. यात दोनशे व्यापारी सहभागी झाले होते. बंदला नाग विदर्भ चेम्बर्स ऑफ कॉमर्स,कांदा बटाटा बाजार अडतियी वेलफेअर असो., नागपूर फ्रूट डिलर्स असो.,कळमना धान्यगंज अडतिया मंडळाने ही पाठिंबा दिला आहे.

बाजार समितीच्या बहेर सेस लागत नाही. मात्र आतमध्ये तो आकारला जातो. त्यामुळे किंमती आणि व्यवसायावरही परिणाम होतो. त्यामुळे हा सेस रद्द करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.

सीएएमआयटीचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यानी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन सेस रद्द करण्याची विनंती केली. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ असे, आश्वासन त्यांनी दिले.मात्र निर्णय लवकर घेतला नाही तर बाजार समितीमधील असलेल्या व्यापाऱ्यांचे ग्राहक तूटण्याची दाट शक्यता अग्रवाल यांनी व्यक्त केली.होलसेल ग्रेन एॅण्ड सीडस् मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून सेस रद्द करण्याची मागणी केली.