बुलढाणा: साप्ताहिक सुट्या व एकादशीचा जुळून आलेला योग यामुळे विदर्भ पंढरीत सुमारे पन्नास हजार भाविकांची मांदियाळी जमली. सलग दोन दिवस शेगावातील गजानन महाराज मंदिरासह रस्ते आबालवृद्ध भाविकांनी फुलल्याचे दिसून आले.
पवित्र श्रावण मास आणि ऑगस्ट महिन्यातील चौथा शनिवार, रविवार अशी सलग सुटी आली. त्यातच रविवारी पुत्रदा एकादशीचा आली. हजारो भाविक दर एकादशीला ‘ वारी’ करतात. लागोपाठ दोन दिवस शासकीय कार्यालय व बँकेला सुट्या आहेत. विद्यालयांना देखील सुट्या असल्याने भाविकांनी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी एकच गर्दी केली.
हेही वाचा… ‘जनसंवाद यात्रे’चे अधिकृत पोस्टर रिलिज, पदाधिकाऱ्यांना लावता येणार स्वत:चा फोटो
बाहेरगावावरून खासगी वाहन, एसटी बसेस तसेच रेल्वेने प्रवास करून हजारो भाविक संतनगरी शेगावात पोहोचले. त्यांनी पहाटे पाच वाजता पासून श्रींच्या मंदिरात दर्शनाकरिता एकच गर्दी केली. समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दोन ते तीन तास रांगेत उभे राहून हजारो भाविकांनी श्री संत गजानन महाराजांच्या भुयारातील मूर्तीचे, श्रीराम, लक्ष्मण व माता सीता यांच्या मूर्तीचे, श्रींच्या शयनकक्षात गादी येथे विठ्ठल व हनुमंताच्या मूर्तीचे दर्शन घेतले. संस्थानतर्फे फराळ व महाप्रसादाचा लाभ घेतला.
भाविकांनी श्री दासगणू महाराज रचीत श्री गजानन विजय ग्रंथ मधील २१ अध्यायाचे श्रद्धेने पारायण केले. दोन दिवस लागोपाठ सुट्या असल्याने शेगाव मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलेले दिसत होते. फुलांचे हार, पेढे, कुंकू गुलाल, अष्टगंध, फोटो, मूर्त्या, यांची चांगली विक्री झाली. संस्थांनचे वाहनतळ ‘हाऊसफुल्ल’ झाल्याने अनेकांना रस्त्यावर वाहने उभी करावी लागली.