लोकसत्ता टीम
नागपूरः रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.
आणखी वाचा-अकोट-खंडवा रेल्वेच्या कामाला निधीचे बळ; अर्थसंकल्पात तरतूद, भूसंपादनासह इतर कार्याला गती येणार
देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले. सगळ्याच रेल्वे गाडीत धुके रहित यंत्रणा लावण्याचे नियोजन असून टप्प्याटप्प्याने ती केली जाणार आहे. नागपूर मंडळातील काही भागात रेल्वेची गती १२५ वरून १३० पर्यंत वाढवली आहे. नागपूरसह इतर रेल्वे स्थानक व रेल्वे गाड्यांत अवैध वेंडर्ससह गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा बंदोबस्त करण्यासाठीही पावले उचलणार असल्याचेही यादव यांनी सांगितले.
नागपूर-पुणे दुरांतोसह इतर रेल्वेबाबत गरज तपासली जाईल
नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसच्या धर्तीवर नागपूर-पुणे दुरांतो, नागपूर-नांदेड रेल्वेसह इतरही काही शहरासाठी रेल्वे गाड्यांची मागणी प्रवाशांकडून होत आहे. या गाड्यांची गरज तपासून त्याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठवला जाईल, असे यादव म्हणाले.
नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास डिसेंबर २०२५ पर्यंत
नागपूर रेल्वेस्थानकाचा विकास सुमारे ५०० कोटी रुपयांतून तर अजनी रेल्वेस्थानकाचा विकास सुमारे ३०० कोटी रुपयांतून होणार आहे. त्याबाबत संबंधित यंत्रणेने एजेंसी निश्चित केली आहे. या कामाला गतीही दिली गेली असून डिसेंबर २०२५ पर्यंत नागपूर रेल्वेस्थानक आणि मे-२०२६ पर्यंत अजनी रेल्वेस्थानकाचे काम पूर्ण होण्याची आशाही राम करण यादव यांनी व्यक्त केली.
बडनेरा-वर्धा-नागपूर विभागाची तपासणी
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव यांनी शुक्रवारी बडनेरा-वर्धा-नागपूर विभागाची तपासणी करत येथील रेल्वे रूळ, रेल्वेस्थानक, रेल्वे कॉलनी, ब्रिजसह इतर पायाभूत सुविधांची तपासणी केली. नागपूर-वर्धा तिसरा रूळसह इतरही प्रकल्पाची माहिती घेत त्यांनी सगळ्या कामांवर समाधान व्यक्त केले. प्रवासी सुविधांबाबतही काही सूचना त्यांनी मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या अधिकाऱ्यांना केल्या.