मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीचा दौरा केला असला तरी पूरग्रस्त भागाचे पंचनामे अजूनही झालेले नाहीत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत बसून काम करणे, मंत्रिमंडळ गठित करून ३७ जिल्ह्यांचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देणे, त्यांना जिल्ह्यात ठाण मांडून बसायला सांगायला हवे. परंतु, मंत्रिमंडळच अस्तित्वात नसल्याने पूरग्रस्तांसह सामान्य जनतेला त्याचा फटका बसला आहे, अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली.

पवार यांनी गुरुवारी पूरग्रस्त चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी गडचिरोलीत त्यांच्यासोबत माजी मंत्री आमदार धर्मरावबाब आत्राम, माजी मंत्री चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष वासेकर होते. चंद्रपुरात काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर, राष्ट्रवादी ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर अध्यक्ष राजीव कक्कड होते. यावेळी पत्रपरिषदेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर थेट निशाणा साधला. मंत्रिमंडळ विस्तार रखडल्याने जनतेच्या हालअपेष्टांमध्ये वाढ झाल्याची टीका आहे. गडचिरोलीत शिवणे गावात बांधावर जाऊन त्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांशी त्यांनी संवादही साधला, तर चंद्रपुरात रहमतनगर, सिस्टर कॉलनी, भद्रावती व वरोरा येथे भेट देऊन पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत शासनाने तात्काळ करावी अशी मागणी केली. गडचिरोलीमध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी देखील त्यांनी. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडताना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

मेडीगट्टा प्रश्नी दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी चर्चा करावी

तेलंगणातील मेडीगट्टा प्रकल्पामुळे सिरोंचा तालुका उद्ध्वस्त झाला आहे. अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी संयुक्त बैठक बोलावून चर्चा करावी. तांत्रिक माहिती घेऊन यावर वेगळा विचार करावा, असेही पवार म्हणाले. पावसाळी अधिवेशन तात्काळ घ्यावे, अशी मागणी करताना मेडीगट्टाचा विषय सभागृहात लावून धरणार असल्याचेही ते म्हणाले. धरणाचे पाणी सोडताना इतर राज्यांना व तेथील जिल्हा तसेच गावांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे अशीही सूचना केली. सिरोंचा-आलापल्ली या शंभर किमीच्या राष्ट्रीय महामार्गाची चाळणी झाली आहे. रस्त्यांवरील खड्डे बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर हा विषय टाकणार असल्याची माहिती दिली. वन विभागाच्या नाहरकत प्रमाणपत्रामुळे रस्ते दुरुस्तीची कामे थांबली असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

नदीकाठावर आठ ते दहा वस्त्या

चंद्रपूर शहरात नदीकाठावर आठ ते दहा वस्ती आहेत. पूरग्रस्त भागातील या वस्त्या उभ्या कशा राहिल्या. बेकायदेशीर प्लॉट विक्री अशी सुरू आहे यावर जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांना पवार यांनी धारेवर धरले. तसेच कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. यापुढे अशी प्लॉट विक्री होता कामा नये असेही निर्देश दिले.

चंद्रपूर, परभणी, लातूर, अकोला या चार महापालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट आहे. कुठेही स्वच्छता, साफसफाई नाही, सिमेंट रस्ते बांधण्यात आले पण रस्ताचे बाजूला साधी नाली नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

धानोरकर, जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज काँग्रेस खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या घरी तथा महाविकास आघाडीतून एकनाथ शिंदे सरकार सोबत गेलेले चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी भेट दिली.