अकोला नांदेड महामार्गावर डही इरळा शेतशिवारात असलेल्या खाजगी डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. शेतातील पिकांची वाढ खुंटली असून पिकांची राखरांगोळी होत आहे, तसेच जनावरे आणि मानवांना देखील विविध त्वचारोगाचे आजार उद्भवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने करूनही कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मालेगाव तालुक्यातील डही इरळा शेतशिवारामध्ये खाजगी डांबराचा प्लांट आहे. हा प्लांट शेतीच्या परिसरात असल्याने या प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे परिसरातील शंभर ते दीडशे एकरातील गहू, हरभरा, तूर, यासह फळ पिकांचे प्रचंड नुकसान होत आहे. डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या प्रदूषित धुरामुळे पिकांची वाढ खुंटली असून पिके करपून जात आहेत. तसेच शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनादेखील विविध त्वचारोग उद्भवत आहेत. अत्यंत दूषित व दुर्गंधित वासामुळे शेतामध्ये काम करणे त्रासदायक झाले आहे.
हेही वाचा – ‘अंनिस’चे श्याम मानव यांना जीवे मारण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
शेतकऱ्यांना शेतीशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने शेतकरी जीव मुठीत धरून काम करीत आहेत. डांबरीकरणाचा प्लांट पूर्णपणे बंद करावा, अशी मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, याबाबत कुठलीच कारवाई अद्यापही प्रशासनाकडून करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष व्यक्त होत आहे.