अकोला: नववर्षाच्या सुरुवातीला कोविडचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्ण आढळल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. २७ डिसेंबर ते ३ जानेवारीदरम्यान तब्बल एक हजार ५२६ कोविड चाचण्या करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जेएन-१ उपप्रकाराचा रुग्ण जिल्ह्यात आढळून आला. त्यानंतर आणखी करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झाले असून चाचण्यांच्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ६८ आरटीपीसीआर व १४५६ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज १० आरटीपीसीआर व ग्रामीण भागात ६५ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यात एकही करोनाबाधित आढळून आला नाही.
हेही वाचा… नागपूरकरांनो घराबाहेर पडणार असाल तर हे वाचा, वाहतूक मार्गात बदल
नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी वापरणे, हातांची स्वच्छता, जोखमीच्या व्यक्तींनी गर्दीत न जाणे, कुठलीही सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी झाल्यास त्वरित तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जिल्ह्यात चार सक्रिय रुग्ण
जिल्ह्यात एकूण चार सक्रिय रुग्ण आढळून आले आहेत. त्यात दोन रुग्ण पंचगव्हाण व एक मोर्शी (अमरावती) येथे आहे. सौम्य लक्षणांमुळे तिन्ही रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. मंगरूळपीर तालुक्यातील एका व्यक्तीला कोविड-१९ ची बाधा झाल्याचे आढळले. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.