अकोला: अकोलेकरांना पुढील काही दिवस पाणी जपून वापरावे लागणार आहे. भर पावसात पाणी संकट येणार आहे. अमृत योजनेच्या तांत्रिक कामामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहील. त्यामुळे शहरातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानांतर्गत ‘स्काडा’ व ‘ऑटोमेशन’चे कामामधील ‘फ्लोमीटर’ बसविण्याच्या कामासाठी ६५ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रावरून होणारा पाणीपुरवठा २३ ते २५ जुलैपर्यंत बंद राहणार आहे. महाजनी प्लॉट, तोष्णीवाल लेआऊट, आदर्श कॉलोनी, केशव नगर, नेहरु पार्क, रेल्वे स्टेशन, अकोट फैल, गंगा नगर, जोगळेकर प्लॉट, लोकमान्य नगर, गुडधी, उमरी, शिवणी, शिवर जलकुंभांचा कामामध्ये समावेश असून या जलकुंभ परिसरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
हेही वाचा… ही दोस्ती तुटायची नाय… राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे देवेंद्र प्रेम
२५ एमएलडी प्रकल्पावरून होणारा शिव नगर, आश्रय नगर व बसस्थानक मागील जलकुंभावरून होणारा पाणी पुरवठा सुरळीत राहणार आहे. शहरातील नागरिकांनी पाण्याची पुरेशी साठवणूक करून पिण्याच्या पाण्याच्या अपव्यय टाळून सहकार्य करावे, असे आवाहन मनपा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल डोईफोडे यांनी केले आहे.