राज्यात पोलिसांच्या रिक्त जागांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
अनिल कांबळे
नागपूर : राज्यात लोकसंख्येच्या प्रमाणात पोलीस विभागात अनेक जागा रिक्त असल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांवर ताण निर्माण झाला आहे. राज्यात एक लाख लोकसंख्यामागे केवळ १६९ पोलीस तैनात आहेत. त्यामुळे राज्यातील सुरक्षा व्यवस्था ऐरणीवर आहे.
राज्यात पोलिसांचे मंजूर संख्याबळ २ लाख २१ हजार २५९ इतके आहे. त्यापैकी १ लाख ८७ हजार ९३१ इतकी पदे भरली आहेत. त्यामुळे राज्य पोलीस दलात तब्बल ३३ हजार ३२८ पदे रिक्त आहेत. यात महिला पोलिसांची संख्या ३१ हजार २२३ इतकी आहे. पोलीस विभागात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची मर्यादित असल्यामुळे रोजचा बंदोबस्त आणि तपासावर त्याचा गंभीर परिणाम होत आहे.पोलिसांचे संख्याबळ कमी असल्यामुळे राज्यात गुन्हेगारी वाढत आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे दाखल करण्याच्या बाबतीत चवथ्या क्रमांकाचे राज्य आहे.
नवीन भरतीमुळे ताकद वाढणार
राज्यात एकूण १८ हजार ३३१ पोलीस कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू असून पहिल्या टप्प्यात ७ हजार उमेदवारांची भरती होत आहे. या भरतीमुळे राज्य पोलीस दलाला बळ मिळेल. बंदोबस्त आणि तपास कामासाठी मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे.
महिला पोलिसांची गरज
राज्य पोलीस दलात महिला पोलिसांची संख्या ३१ हजार २२३ इतकी आहे. त्याचे प्रमाण एकूण पोलीस संख्याबळाच्या तुलनेत ही संख्या १६.६१ टक्के इतके आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.