वाशिम: केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या आंदोलनाचा इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम जाणवू लागला आहे. टँकर चालक या संपात सहभागी झाल्यामुळे पेट्रोल, डिझेलचा पुरवठा विस्कळीत होण्याची भीती वर्तवली जात आहे.
इंधन तुटवड्याच्या भीतीने वाहन चालकांनी काल सायंकाळपासून पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. पंपावर आणि पंपाबाहेरपर्यंत वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या असून वाहतूक सेवा प्रभावित झाल्याचे दिसून येत आहे. अशीच स्थिती राहिल्यास वाशीम जिल्ह्यात दुपारनंतर पेट्रोल-डिझेलचा साठा संपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा… ट्रक चालकांच्या संपाचा शाळांना फटका; स्कुल बसचे वाहक नसल्याने…
जिल्ह्यातील १५० पेट्रोल पंपांपैकी बऱ्याच पंपांवरील पेट्रोल व डिझेलचा साठा संपण्याच्या मार्गावर आहे. दोन-तीन दिवसांपूर्वी इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे अनेक पेट्रोल पंप संचालकांनी इंधनाचा साठा करून ठेवला नव्हता. परिणामी, अशा पेट्रोल पंपांवरील पेट्रोल-डिझेलचा साठा संपलेला आहे. इंधन तुटवड्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले असून अनेक क्षेत्र प्रभावित झाल्याचे चित्र आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसह दुपारी पंप चालकांची बैठक
ट्रकचालकांचा संप, इंधन पुरवठा, याबाबत जिल्हाधिकारी आज दुपारी आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला पेट्रोल पंपचालक, नोडल अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित राहतील. इंधन तुटवडा व संपावर या बैठकीत काय तोडगा निघेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.