नागपूर: ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे सोमवारपासून नागपूर आणि इतरही बऱ्याच भागत पेट्रोल- डिझेलचा पुरवठा न झाल्याने वाडीत एक तर शहरातील बरेच पेट्रोल पंप मंगळवारी सकाळी कोरडे पडल्याचे चित्र होते. त्यामुळे नागरिक पेट्रोलसाठी फिरत होते. आज पुरवठा न झाल्यास स्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे.
राजतातील विविध भागासह नागपुरात ट्रक चालकांच्या आंदोलनामुळे सोमवारपासून विदर्भातील सर्वच पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठा विस्कळीत झाला. त्यातच पेट्रोल पंप बंद राहण्याची अफवा पसरल्याने नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली. सोमवारी रात्री आणि मंगळवारी सकाळी काही पेट्रोलपंप कोरडे पडले. आणखी पेट्रोल पुरवठा या पंपाला झाला नाही तर सर्वच पंप कोरडे पडण्याचा धोका आहे.
हेही वाचा… ६०० पोलिसांची पदोन्नती रखडली,८४ अधिकाऱ्यांची ‘मॅट’मध्ये धाव
दरम्यान पेट्रोलियम कंपन्यांनी टँकरला संरक्षण देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले. या मुद्यावर मंगळवारी बैठक होण्याची शक्यता आहे. पुरवठा विस्कळीत झाल्यास मंगळवारी पेट्रोलचा तुटवडा जाणवण्याच्या शक्यतात विदर्भ पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अमित गुप्ता यांनी व्यक्त केली. दरम्यान नागपूर जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे लोकसत्ताशी बोलतांना म्हणाले की, प्रत्येक पेट्रोलपंपांवर तीन दिवस पुरेल एवढा पेट्रोल- डिझेलचा साठा असतो. सोमवारी पुरवठा झाला नाही तरी दोन दिवस पुरेल एवढा साठा आहे. परंतु आंदोलन कायम राहिल्यास पोलीस संरक्षणात टँकर मागवावे लागतील. नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली जाईल.
अशी स्थिती राहिली तर दुपारपर्यंत सर्वच पेट्रोल पंप कोरडे पडणार
नागपुरातील पेट्रोल पंपांवर सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. बहुतांश पेट्रोल पंपांवर वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक ट्रक चालकांचे आंदोलन बघता पुढे काही दिवस पेट्रोल मिळेल की नाही या चिंतेपोटी आवश्यकतेहून दुप्पट पेट्रोल भरत आहेत. शहरात अशी स्थिती कायम राहिलास दुपारपर्यंत शहरातील तीनशे पैकी बहुतांश पेट्रोल पंप कोरडे पडण्याची चिंता पेट्रोल डीलर्स कडून व्यक्त केली जात आहे. सध्या शहरातील ३० टक्केच्या जवळपास पेट्रोल पंप कोरडे पडल्याची ही माहिती पेट्रोल पंप दिलर्स देत आहे.
पोलीस सुरक्षेची मागणी
नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी आज तेल कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांसह पेटोल डिलर्सची बैठक घेतली. यावेळी पेट्रोल डिलर्स असोसिएशनने पोलीस सुरक्षेत टँकरद्वारे पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करावा, अशी मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांकडे पाठवल्याची माहिती आहे. आता पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहे.