अकोला: जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा सलग दुसऱ्या दिवशी तडाखा बसला. मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतातील पिकांची अतोनात हानी झाली आहे. शहरासह जिल्ह्यात रविवार व सोमवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार गेल्या दोन दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागात तसेच शहरात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जोरदार पावसामुळे विविध भागात पाणी साचले आहे. तसेच रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांतील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये शिरले. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागात वृक्षांच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या. अवकाळी पावसाच्या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आले आहे.

हेही वाचा… आता लग्नांची धामधूम; बाजारपेठेत उलाढाल वाढणार

खरीप हंगामातील कापूस, तूर पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकरी चिंतेत सापडला.

दरम्यान, बाळापूर तालुक्यातील कसुरा साझामधील टाकळी खोजबळनजीक असलेल्या खरबी शिवारात अवकाळी पावसामुळे सहा मेंढ्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच महसुल विभागाच्या तलाठी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवावर पाणी

क्रीडा विभागातर्फे १५ ते २९ या वयोगटातील युवक व युवतींच्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सव २८ नोव्हेंबर रोजी वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला होता. पावसामुळे हा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. हा महोत्सव डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयोजित करण्यात येणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to unseasonal rains the crops in the fields are severely damaged in akola ppd 88 dvr