वनखात्याच्या विरोधात तक्रारीचा सूर
जखमी वन्यप्राण्यांना सांभाळण्यासाठी वनखात्याकडे जागा नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत त्या वन्यप्राण्याला ठेवायचे तर महाराजबाग प्राणिसंग्रहालयाशिवाय पर्याय नाही. सुरुवातीला प्राणिसंग्रहालय प्रशासनानेही त्यांच्याकडे प्राणी आणि पक्ष्यांची संख्या वाढावी म्हणून ते ठेवून घेतले. मात्र, हे प्राणी व पक्षी डोईजड ठरू लागल्याने आता महाराजबाग प्राणिसंग्रहालय प्रशासनाने वनखात्यावर अप्रत्यक्षपणे निशाना साधण्यास सुरुवात केली आहे.
शहरात ब्रिटिशकालीन वास्तूंची कमतरता नाही. मध्यवर्ती संग्रहालय आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालय या कधीकाळी मध्यभारताचे आकर्षण ठरणाऱ्या वास्तूंची लोकप्रियता हळूहळू कमी होत चालली आहे. कृषी महाविद्यालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांची कमी झालेली संख्या वाढावी म्हणून प्रशासनाने वनखात्याकडे असलेल्या जखमी वन्यप्राण्यांना प्राणिसंग्रहालयात ठेवून घेतले. प्राणिसंग्रहालय प्रशासन अशाच प्राणी आणि पक्ष्यांच्या शोधात असल्याचे लक्षात आल्यानंतर हळूहळू लोकांनीही त्यांच्याकडचे पक्षी, कुणाला जखमी अवस्थेत असणारे पक्षी दिसल्यास तेसुद्धा या प्राणिसंग्रहालयात आणण्यास सुरुवात केली. मात्र, अशा वन्यप्राणी आणि पक्ष्यांना स्वीकारण्याचीही वृत्ती महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या अंगलट आली आहे. जखमी, अपंग वाघ आणि बिबट वनखात्याने या ठिकाणी आणून ठेवल्यानंतर त्याच्या खर्चाकडे दुर्लक्ष केले ही बाबही खरी आहे. त्यांच्याचमुळे प्राणिसंग्रहालयाची रया कायम असल्यामुळे संग्रहालय प्रशासनाने उघडपणे खर्चाच्या बाबीवर बोलणे नेहमीच टाळले. मात्र, आता उठसूठ जो तो कधी माकड, कधी पोपट, कधी मांजर घेऊन या प्राणिसंग्रहालयाची वाट पकडत असल्याने प्रशासनानेही वनखात्याच्या विरोधात तक्रारीचा सूर आळवायला सुरुवात केली आहे.चंद्रपूर शहरात शिव्या देणाऱ्या पोपटाचा जो प्रकार समोर आला, तसाच काहीसा प्रकार नागपुरातसुद्धा आठवडाभरापूर्वी घडला. पोपटाच्या मालकानेच स्वत: पोपट पिंजऱ्यासहीत महाराजबागेत आणून ठेवला.जून महिन्यात वनखात्याने एका जखमी खुबडाला स्वयंसेवी पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडे उपचारासाठी सोपवले. त्या घुबडावर शस्त्रक्रियेची गरज असल्याने आणि सध्याच ते शक्य नसल्यामुळे त्या स्वयंसेवीने ते घुबड महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आणून ठेवले. मात्र, प्राणिसंग्रहालयाच्या प्रशासनाला आपल्याकडे असे घुबड आणून ठेवल्याची तीळमात्रही कल्पना नसल्याचे त्यांच्याशी बोलल्यानंतर लक्षात आले.पोपट आणि घुबडाविषयी विचारणा केल्यानंतर वनखात्याच्या प्राणी व पक्षी आणून ठेवण्याच्या पावित्र्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. महाराजबाग प्राणिसंग्रहालय हे वनखात्याच्या कृपेमुळे ‘डम्पिंग यार्ड’ बनत चालल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader