चंद्रपूर: शहरालगत वेकोलिची दुर्गापुर खुली कोळसा खाण काही वर्षांपासून सुरू आहे. या खाणीमुळे जल जंगल व वाघांचा अधिवास कमी झाल्याचा आरोप पर्यावरणवादींकडून होत असतानाच राज्य शासनाने मंगळवारी कोळसा खाण विस्तारासाठी १२१.५८ हेक्टर वनजमीन वळती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे खाणीच्या विस्तारीचा मार्ग मोकळा झाला असून कालमर्यादा १२ वर्षांनी वाढविण्यात आल्याने कोळसा उत्पादन क्षमताही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वेकोलि चंद्रपूर क्षेत्रांतर्गत दुर्गापूर खाण सर्वाधिक कोळसा उत्पादन करणारी म्हणून ओळखली जाते. सद्य:स्थितीत या खाणीतून चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला वर्षाला सुमारे १७ लाख मेट्रिक टन कोळशाचा पुरवठा केला जात आहे. मात्र, खाणीचे चार ते पाच वर्षे एवढेच आयुर्मान शिल्लक होते. त्यामुळे वेकोलि व्यवस्थापनापुढे विस्तारीकरणाचा प्रश्न उभा ठाकला होता. व्यवस्थापनाने खाणी लगतची १२१.५८ वनजमीन मिळविण्यासाठी वेकोली पाठपुरावा सुरू केला. याबाबतच प्रस्ताव केंद्र शासनाकडेही पाठविण्यात आला होता.

हेही वाचा >>> विदर्भातील एकमेव फुलपाखरू उद्यानाला पर्यटकांची पसंती; नेमके कुठे आणि काय आहे फुलपाखरू उद्यान वाचा…..

काही महिन्यांपूर्वी पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळ, स्थायी समितीची दिल्ली येथे ७२ वी बैठक झाली. या बैठकीत दुर्गापूर खुल्या कोळसा खाण विस्ताराकरिता १२१.५८ हेक्टर वनजमीन वळविण्याच्या शिफारशीचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समितीने काही अटींवर या प्रस्तावाची शिफारस केली. राज्याच्या महसूल व वन मंत्रालयाने जमीन वळती करण्याबाबतचा निर्णय मंगळवारी जारी केला. त्यामुळे या खाणीच्या विस्ताराचा आता मार्ग मोकळा झाला आहे.

पर्यावरणवाद्यांचा विस्तारीकरणाला विरोध

खाणीच्या विस्तारीकरणाला चंद्रपूर येथील वन्यजीव संस्था आणि वन्यप्रेमींनी ‘ताडोबा बचाव समितीची स्थापना करून विस्तारीकरणाला विरोध केला आहे. या खाणीमुळे ताडोबाचे जंगल व वाघाचा भ्रमणमार्ग धोक्यात येईल. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्राच्या सीमेजवळ २०० ते ३०० मीटरच्या अंतरावर ही कोळसा खाण येणार असल्याने चंद्रपूर परिसरातील वन्यजीवावर वाईट परिणामा होईल. तसेच मानव- वन्यजीव संघर्ष आणखी तीव्र होईल, अशी भीती पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केली आहे.

Story img Loader