गडचिरोली : काही दिवसांपूर्वी नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सोनू उर्फ भूपती याने पत्रकाच्या माध्यमातून केंद्र सरकारपुढे शांती प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतरही छत्तीसगडमध्ये नक्षलविरोधी कारवाया सुरु असल्याने पुन्हा एकदा नक्षलवाद्यांच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने युद्धविरामची मागणी करीत गयावया करणारे पत्रक जारी केले आहे. यात पहिल्यांदाच नक्षल्यांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय वर्मा यांचे आभार मानले आहे. यातून सरकारच्या नक्षलविरोधी धोरणामुळे नक्षलवादी हतबल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे समूळ उच्चाटन करण्याची घोषणा केली आहे. त्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड, महाराष्ट्रातील गडचिरोली, झारखंड, तेलंगणा या प्रमुख नक्षल प्रभावित राज्यात सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात नक्षलविरोधी कारवाया सुरु केल्या आहे. यामुळे मागील १५ महिन्यात ४०० हून अधिक नक्षलवादी ठार झाले. शेकडोच्या संख्येने आत्मसमर्पित होत आहेत. यात नेत्यांचा समावेश असल्याने ही चळवळ नेतृत्वहीन झाल्याचे बोलल्या जाते. त्यामुळे घाबरलेल्या नक्षल नेत्यांनी आणि समर्थकांनी २४ मार्चला तेलंगणात एक बैठक घेऊन सरकारपुढे युद्ध विराम प्रस्ताव मांडला होता. दोन्ही पक्षात शांती वार्ता होईपर्यंत कारवाया रोखण्यात याव्या, अशी विनंतीही करण्यात आली होती. मात्र, कारवाया सुरूच असल्याने हतबल झालेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा पत्रक जारी करून महिनभरासाठी तरी युद्धविराम करा, अशी विनवणी केली आहे. एरवी जहाल भाषेत सरकारला इशारा देणारा नक्षलवाद्यांच्या उत्तर पश्चिम सब झोनल ब्युरो प्रभारी रुपेश याने पहिल्यांदाच अतिशय सौम्य भाषेत विनंती केली आहे. सोबतच छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय वर्मा यांनी शांती वार्तासाठी प्रतिसाद दिल्याने त्यांचे आभार व्यक्त केले आहे. मात्र, कारवाया रोखल्यास हे शक्य आहे. आमच्या नेत्यांच्या सुरक्षेची हमी सरकारने दिली पाहिजे. असेही यात नमूद कारण्यात आले आहे.
नेत्यांना तर भेटू द्या
शांती प्रस्तावासाठी नक्षलवाद्यांचे प्रतिनिधी मंडळ, केंद्रीय समिती सदस्य आणि विशेष झोनल समिती सदस्य यांच्यात चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, अशा वातावरणात आम्ही भेटल्यास आमच्या सुरक्षेची हमी सरकारने द्यायला हवी. त्यासाठी किमान महिनाभर तरी युद्धविराम लागू केले पाहिजे. शांती प्रस्तावामागे आमचा कुठलाही दुसरा उद्देश्य नाही. असेही नक्षल्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आधी शस्त्र खाली टाका
नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पुढे आल्यानंतर सरकारकडूनही यासंदर्भात विविध प्रतिक्रिया उमटल्या. नक्षलवाद्यांना युद्धविराम हवा असेल तर त्यांनी प्रथम शस्त्र खाली टाकून आत्मसमर्पण केले पाहिजे. असे स्पष्ट करण्यात आले आहे. दोन दशकापूर्वी तेलंगणात असाच एक प्रयत्न झाला होता. मात्र, यातून कुठलाच मार्ग निघाला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा प्रस्ताव हा नक्षलवाद्यांच्या रणनीतीचा एक भाग असल्याची शंका, पोलिसांनी व्यक्त केली आहे.