चंद्रपूर : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आलेल्या मंत्री, आमदार तथा सचिव व अन्य अधिकाऱ्यांनी ताडोबात व्याघ्र पर्यटनाचा आनंद लुटला. शुक्रवार, शनिवार आणि रविवार, असे सलग तीन दिवस नाताळची सुटी आणि अतिविशिष्ट अतिथींच्या आगमनामुळे ताडोबा ‘हाऊसफुल्ल’ होते.
विदर्भाच्या पर्यटनाचा मानबिंदू म्हणून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाकडे बघितले जाते. देश-विदेशातील पर्यटकांची व्याघ्रभ्रमंतीसाठी येथे गर्दी होते. हमखास व्याघ्रदर्शनासाठी ताडोबा प्रसिद्ध असल्याने येथे मंत्र्यांपासून आमदार, खासदार तथा सचिव व अन्य अधिकारी तसेच अतिविशिष्ट पर्यटकांची गर्दी होते. नागपूर हिवाळी अधिवेशन काळातही येथे गर्दी होत असते. शुक्रवार, शनिवार व रविवारी येथे ऑनलाइन नोंदणी हाऊसफुल्ल असतानाही अतिविशिष्ट कोट्यातून अनेकांना प्रवेश देण्यात आला.
“भूखंड घ्या.. कुणी गायरान घ्या.. खोक्यानं घ्या.. कुणी खोऱ्यानं घ्या..,” विरोधकांचे अभिनव आंदोलन
पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील चिमूरमार्गे ताडोबा भ्रमंती करून गेले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही ताडोबात व्याघ्र सफारीचा आनंद घेतला. भाजप आमदार नितेश राणे, आमदार पंकज भोयर, आमदार सुनील भुसरा, यांच्यासह महादेव जानकर व विविध विभागाचे सचिव, अधिकारी तथा अतिविशिष्ट अतिथी यांनीही या काळात ताडोबात हजेरी लावली. नाताळच्या सुटीनिमित्तही ताडोबात पर्यटकांची मोठी गर्दी होती.