Nagpur Breaking News Update Today : विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने महाल, गांधी गेट जवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर औरंगजेबचा प्रतिकात्मत पुतळा सोमवारी जाळला. त्यानंतर सांयकाळी दोन गटात वाद निर्माण झाला आणि दंगल उसळली. यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली.
महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क परिसरातही याची झळ पोहोचली. यंदर्भात येथील नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला. चिटणीस पार्कमधील पेशने कुटुंबीयांच्या घरावर दगडफेक करण्यात आली. तसेच त्यांची गाडी जाळण्यात आली. पेशने कुटुंबातील गृहिणीने सांगितले की, सोमवारी सांयकाळी सात ते साडेसात वाजता दरम्यान हा प्रकार घडला. यावेळी अचानक जमावाने लोखंडी रॉड आणि दगडांच्या सहाय्याने आमच्या भागात हल्ला चढवला.
त्यावेळी जमावातील काही लोक अचानक मोठमोठे दगड फेकायला लागली. आम्ही सगळे घरात होतो. माझे पती आणि मुलगा बाहेर होता. गर्दी वाढल्यानंतर मी त्यांना घरी बोलावून घेतले. ते घरी येईपर्यंत जोरदार दगडफेक सुरु झाली. आम्ही दार-खिडक्या लावून घेतली. दगडफेक सुरु झाली तेव्हा मी माझे पती आणि मुलाला आत घेतले. या दगडफेकीमुळे पोलिसही आमच्या घरात आले. त्यांच्यावरही जमावाकडून दगडफेक केली जात होती. जमावातील काहींनी मारण्यासाठी गट्टू उचलला होता. त्यामुळे पोलीस संरक्षणासाठी आमच्या घरात आले, असे पेशने कुटुंबीयांनी सांगितले.
जमावातील लोकांनी तोंडावर रुमाल आणि मास्क लावले होते. याठिकाणी पोलीस होते. पण जमाव मोठा असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणता येत नव्हती. जमाव पूर्ण तयारीनिशी आला होता. त्यांनी आमच्या चारचाकी गाडीत मोठा दगड टाकून कार पेटवून दिली. ही कार पेशने कुटुंबीयांच्या घरालगत पार्क केली होती. त्यामुळे गाडीला आग लागल्यानंतर पेशने कुटुंबीयांच्या घराची भिंत आणि खिडकीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीमुळे खिडकी आणि भिंतीचा परिसर काळाकुट्ट झाला आहे.
पोलीस अधिकारी जखमी
हिंसाचारावेळी पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी गंभीर जखमी झाले असून ते रुग्णालयात दाखल आहेत. निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते, ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला आहे तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली आहे, तेही रुग्णालयात दाखल आहेत. तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला आहे, मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर आहेत. याप्रकरणी विविध पोलीस स्टेशन मध्ये एफआयआर दाखल झाले आहेत.