चंद्रशेखर बोबडे

महात्मा गांधी यांनी खेडय़ाकडे चला, असा सल्ला दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शहरीकरण वाढले. टाळेबंदीमुळे मात्र आता पुन्हा लोकांची पावले रोजगाराच्या शोधासाठी खेडय़ाकडे वळत असल्याचे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेवरील  मजुरांच्या संख्येत झालेल्या लक्षणीय वाढीतून दिसून येते. ४ एप्रिल ते ४ मे या एक महिन्यात राज्यभरात मनरेगाच्या कामांवर ३ लाख ४० हजार मजूर वाढले.

४ एप्रिल रोजी राज्यात मनरेगावरील कामावर उपस्थित मजुरांची संख्या १९ हजार ५०९ होती. ४ मेपर्यंत त्यात तब्बल ३.४० लाखाने वाढ होऊन ती ३ लाख ५९ हजार ९२३ वर गेली असल्याची माहिती मनरेगा आयुक्तालयातून मिळाली.

करोनाच्या भीतीपोटी राज्यातील २६ हजार ८८६ ग्रामपंचायतीमध्ये  एकही काम सुरू नव्हते. या काळात मनरेगाची कामे रोजगारासाठी मोठा पर्याय ठरला, असे मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या उपस्थितीवरून दिसून येते. विशेष म्हणजे, एप्रिल महिन्यापासून मजुरांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत गेली. १७ एप्रिलला ४० हजारांवर असणारी संख्या पाचच दिवसांत एक लाखावर गेली. ४ मे रोजी राज्यातील ४२ हजार कामांवर ३ लाख ५९ हजार ७२३ मजुरांची नोंदणी करण्यात आली. विदर्भातील मेळघाटमध्ये मोठय़ा प्रमाणात कामे हाती घेण्यात आली आहेत.

अशी वाढली संख्या..

४ एप्रिल-१९,५०९; १७ एप्रिल-३९,३७६; २२ एप्रिल- १,०८,७९०; २३ एप्रिल १,४० ,१९६; २४ एप्रिल- १,७१,७६९; २५ एप्रिल-२,०३,२०९; २६ एप्रिल २,१६,१८६; २७ एप्रिल-२,१२,८००; २८एप्रिल- २,३३,६२३; २९ एप्रिल २,४३,६७२; ३० एप्रिल २,४६,३६१; १ मे-२,८४,६६०; ३ मे-३,३२,३५५

प्रत्येक जिल्ह्य़ाचे ग्रामपंचायत निहाय कामाचे नियोजन केले. ते सुरू करण्यासाठी यंत्रणेला प्रोत्साहन दिले. त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळेच टाळेबंदीसारख्या संकट काळातही मनरेगाची ४२ हजारांवर कामे सुरू आहेत. यावर साथसोहळ्याचे नियम पाळण्यात येत आहे.

– ए.एस.आर. नायक, आयुक्त मनरेगा

Story img Loader