चंद्रपूर : वायू व हवा प्रदूषणाच्या तीव्र समस्येचा सामना करणाऱ्या चंद्रपूर शहरात महापालिका लवकरच ‘पीएम ई-बस सेवा’ सुरू करणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे महापालिकेने ५० ‘ई-बस’चा प्रस्ताव पाठवला आहे. शहर आणि परिसरातील २५ किलोमीटरपर्यंत ही बस लोकांना सेवा देईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वीज केंद्र, कोळसा खाणी, पोलाद उद्योगांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून शहरवासीयांना वायू व हवा प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. त्यात वाहन प्रदूषणाची भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रदूषणविरहित ‘ई-बस’ चालवण्याचा प्रस्ताव महापालिकेने केंद्र सरकारकडे पाठवला आहे. महापालिका आयुक्त विपीन पालिवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने ऑगस्ट २०२३ मध्ये ‘पीएम ई-बस सेवा’ या नावाने केंद्र-प्रायोजित योजनेला मंजुरी दिली होती. ही योजना दोन श्रेणींमध्ये लागू केली जाईल. पहिल्या श्रेणीमध्ये शहर बस सेवा आणि संबंधित पायाभूत सुविधा आणि दुसऱ्या श्रेणीत ‘ग्रीन अर्बन मोबिलिटी इनिशिएटिव्ह’चा समावेश आहे.

हेही वाचा – मानसेवी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन रखडले? मुख्यमंत्र्यांच्या सूचनेला केराची टोपली

महापालिकेने केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडे दोन टप्प्यात ५० ‘ई-बसचा प्रस्ताव पाठवला आहे. महापालिका आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ई-बस’साठी शहरातील कृषी भवन परिसरातील मोकळ्या भूखंडावर बसस्थानक निर्माण केले जाईल. महापालिकेने पहिल्या टप्प्यात शहरात ३०, तर दुसऱ्या टप्प्यात २० ‘ई-बस’चा प्रस्ताव पाठवला आहे. तीन लाख लोकसंख्येवरील शहरांना ५० ‘ई-बस’ उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

चंद्रपूर शहर व लगतच्या २५ किलोमीटर परिसरातील गावांपर्यंत ही बससेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या बसगाड्या शहरातून बामणी, बल्लारपूर, भद्रावती, घुग्गुस, आरवट-चरवर तसेच मूल मार्गावरील चिचपल्लीपर्यंत धावतील. केंद्रीय संस्थांकडून मंजुरी मिळाल्यानंतर म्हाडा आणि नवीन चंद्रपूर बसस्थानक, चार्जिंग स्टेशन व इतर सेवा केंद्र सरकारच्या निधीतून नागरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून उभारल्या जातील, असेही पालीवाल यांनी सांगितले.

हेही वाचा – एसटी महामंडळातील सर्व संघटनांकडून पुन्हा आंदोलनाचा इशारा; ९ जुलैपासून…

महापालिकेकडून केंद्र सरकारला ‘ई-बस’चा प्रस्ताव पाठवला आहे. कृषी भवन परिसरात ‘पीएम ई-बस’ सेवेसाठी पायाभूत संरचना उभारण्याची प्रशासनाची योजना आहे. ‘सीएमसी’ला शहर बससेवा संचालनाचे कंत्राट दिले जाईल, अशी शक्यता आहे. सरकार शहरातील बस चालवण्यासाठी प्रतिकिमी २५ रुपये अनुदान देईल. मुख्य बसस्थानक व ‘पीएम ई-बस’ स्थानक एकमेकांशी जोडले जाईल. साधारणत: वर्षभरात ही सेवा सुरू होईल. – विपीन पालिवाल, आयुक्त, महापालिका, चंद्रपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E bus will run in chandrapur soon rsj 74 ssb