नागपूर : शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी आणि वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून ई-चालानची व्यवस्था केली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून वाहन एकाचे आणि चालान दुसऱ्यालाच, असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अनेक वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांचा भंग करणारे वाहनचालक ‘सीसीटीव्ही’त कैद झाल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून ‘ई-चालान’ पाठवले जाते. शहरात ७०० ठिकाणांवर जवळपास ३ हजार ८०० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. शहरातील गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची प्रामुख्याने उपयोग करण्यात येतो. तसेच शहरातील बिघडलेली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शहरात चौकाचौकात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वापर केल्या जात आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर चौकातील सिग्नलवर लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्या वाहनचालकाचे छायाचित्र घेतल्या जाते. त्या छायाचित्राच्या आधारावर त्या वाहनमालकाला ई-चालान पाठविण्यात येते. आतापर्यंत ई-चालानची संख्या जळपास कोटींमध्ये गेली आहे. मात्र, सध्या सीसीटीव्हीवरुन केलेल्या ई-चालान वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. जयताळा परीसरात राहणारे जयंत यांची चंदेरी रंगाची दुचाकी असून त्यांच्या दुचाकीवरील चालकाला हेल्मेट नसल्याचे चालान सीसीटीव्हीवरुन आले. चालानमध्ये हेल्मेट चालकाकडे नसल्याचे कारण दाखविण्यात आले. मात्र, त्या चालानमधील छायाचित्र बघितले असता दंड ठोठावण्यात आलेली दुचाकी पांढऱ्या रंगाची असल्याचे लक्षात आले. म्हणजेच सीसीटीव्ही फुटेजवरुन जयंत यांच्या दुचाकीला भलत्याच दुचाकीचे चालान आले. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.
हेही वाचा – फडणवीसांच्या शपथविधीला गेलो नाही कारण…; नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितले
वाहतूक पोलिसांकडून उडवाउडवीचे उत्तरे
चालान केलेली दुचाकी आमची नसल्याचे सांगून जयंता यांनी पोलिसांना चालान रद्द करण्याची मागणी केली. मात्र, वाहतूक पोलिसांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन त्यांची बोळवण केली. भ्रमणध्वनीवर ॲप डाऊनलोड करण्याचा सल्ला देऊन परत पाठवले. अनेकांना चुकीचे वाहतूक चालान कसे रद्द करावे, याबाबत योग्य माहिती नसल्याने चुकीचे चालान भरावे लागत आहे.
हेही वाचा – सोन्याच्या दरात घट, चांदीने वाढवली चिंता… हे आहेत आजचे दर…
सीसीटीव्ही फुटेजवरुन आलेले चालान जर चुकीच्या वाहनाचे असेल तर वाहतूक पोलीस कार्यालयात संपर्क करावा. पोलीस कर्मचाऱ्यांना चुकीचे चालान आल्याची माहिती द्यावी. तसेच वाहतूक पोलिसांचा ॲप डाऊनलोड करुनही चुकीचे चालान रद्द करता येते. – अनिरुद्ध पुरी (पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.)