अमरावती : ई-सिगारेटचा वापर, विक्री, आयात-निर्यात आणि उत्‍पादनावर भारतात बंदी आहे. मात्र, बंदी असतानाही अमरावती शहरातील कॅम्‍प परिसरातील टेक्‍सास स्‍मोकिंग शॉपीत ई-सिगारेटची खुलेआम विक्री आणि वापर केला जात असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार शनिवारी उघडकीस आला. ‘क्राइम इंटेलिजन्स युनिट’च्‍या (सीआययू) पथकाने गाडगेनगर पोलिसांच्‍या सहाय्याने ही कारवाई केली. यावेळी काही तरुणांना ई-सिगारेटचा वापर करताना ताब्‍यात घेण्‍यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीस आयुक्‍त नवीनचंद्र रेड्डी यांच्‍या आदेशावरून सीआययू पथक आणि गाडगेनगर पोलिसांनी ही कारवाई पार पडली. शहरात ई-सिगारेटचा वापर आणि विक्री होत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शनिवारी दुपारी पोलिसांच्‍या पथकाने कॅम्‍प परिसरातील टेक्‍सास स्‍मोकिंग शॉपी या दुकानावर छापा घातला. यावेळी काही तरुण ई-सिगारेट ओढताना दिसून आले. पोलिसांनी या दुकानातून ५५ ई-सिगारेट आणि विशेष सुंगध देणारे घटक जप्‍त करण्‍यात आले. या साहित्‍याची किंमत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये आहे.

सीआययू आणि गाडगेनगर पोलिसांनी ही संयुक्‍त कारवाई केली असून शाळकरी मुलांना या व्‍यसनापासून दूर ठेवण्‍यासाठी पोलीस विशेष लक्ष देत आहेत. शहरात ई-सिगारेटची विक्री होत असल्‍याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या सिगारेटवर बंदी आहे. तरुणांनी त्‍यापासून दूर राहिले पाहिजे, असे पोलीस उपायुक्‍त गणेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

बंदी केव्‍हापासून?

केंद्र सरकारने २०१९ मध्‍ये ई-सिगारेटच्‍या निर्मिती, उत्‍पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री आणि साठवणुकीवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे ई-सिगारेटच्या उत्पादन, निर्मिती, आयात-निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण आणि जाहिरात दखलपात्र गुन्हा असून पहिल्यांदा गुन्हा केल्यास एक वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा हा गुन्हा केल्यास तीन वर्षे तुरुंगवास आणि ५ लाख रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. साठवणुकीसाठी देखील सहा महिने तुरुंगवास किंवा ५० हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

इलेक्ट्रॉनिक सिगारेट हे बॅटरी संचालित उपकरण असून निकोटिन असलेले द्रावण गरम झाल्यावर त्यातून एरोसोल बाहेर पडतो. बंदी घालण्यात आलेल्या सिगारेटमध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक निकोटिन डिलिव्हरी सिस्टिम्स, हिट नॉट बर्न उत्पादने, ई-हुक्का सारख्या उपकरणांचा समावेश आहे. ही अभिनव उत्पादने दिसायला आकर्षक असून विविध प्रकारच्या सुगंधात उपलब्ध आहेत. देशात तरुण मुलांमध्ये याच्‍या वापराचे प्रमाण वाढले आहे.