बुलढाणा : कारागृहात खिचपत पडलेल्या एकाकी कैद्याना आता आपल्या कुटुंबाशी ई-संवाद साधता येणार आहे… होय! आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कैद्यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘ई मुलाखत ‘ असे नामकरण करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बंदी कारागृहात दाखल झाल्यानंतर त्याचा बाहेरील जगाशी व नातेवाईक यांचेशी संपर्क तुटून जातो. वर्षानुवर्षे  यासाठी थेट मुलाखत चा एकमेव पर्याय उपलब्ध होता. मात्र  आता, बंद्यांच्या नातेवाईकासोबत संपर्क साधता यावा, यासाठी बुलढाणा कारागृहातही आधुनिक प्रणालीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. नातेवाईक व वकील यांना ‘व्हर्चुअल’ पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घरबसल्या भेट घेण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. बुलढाणा जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संदीप भुतेकर यांनी ही माहिती दिली.  कैद्यांचे नातेवाईक व वकील यांना व्हर्चुअल पद्धतीने घरुनच मोबाईलचा वापर करून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुविधा उपलब्ध करुन दिली.  बुलढाणा जिल्हा कारागृहातील कैद्यांना त्यांचे नातेवाईक व वकील यांचे भेटीसाठी कारागृहात दोन व्हिडीओ कॉन्फरन्सिंग संच उपलब्ध आहेत. आवश्यकतेनुसार व्हीसी संचांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे भुतेकर यांनी सांगितले.

हेही वाचा >>>‘तीन मुले जन्माला घाला’, सरसंघचालकांनी असा सल्ला दिल्यानंतर आता कौटुंबिक प्रबोधन बैठकीतील भाषणाकडे लक्ष

व्यापक प्रसार

ई-मुलाखत सुविधेचा जास्तीत जास्त वापर व्हावा या करीता कारागृह प्रशासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी कारागृह परिसर व मुलाखत नावनोंदणी कक्षाजवळ माहितीफलक लावण्यात आले आहेत. कारागृह अधीक्षकांच्या साप्ताहिक संचार फेरीदरम्यान सुद्धा बंद्यांना सदर सुविधेची माहिती देऊन नातेवाईक व वकीलांसोबत संवाद साधण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे.

अशी आहे कार्य पद्धती

नातेवाईक व वकील हे एनपीआयपी  या पोर्टलवरुन स्वतःची व बंद्याची माहिती नमुद करुन कारागृहाला व्हीसी भेटीसाठी ऑनलाईन विनंती करतात. पात्र नातेवाईक व वकील यांना कारागृहाकडून  मुलाखतीला मान्यता मिळाल्यानंतर  भेटीची वेळ व दिवस निश्चीत करण्यात येते. कैद्याला कारागृहातून व्हीसीद्वारे उपस्थित ठेऊन बंदी व त्याचे नातेवाईक, वकील यांच्याशी ई-मुलाखत केली जाते. व्हीसी मुलाखतीमुळे कैद्यांचे नातेवाईक व वकील यांचे वेळ, श्रम व पैशाची बचत होणार आहे. आजारी व वयस्कर नातेवाईक तसेच लहान मुले यांना प्रत्यक्ष मुलाखतीस येण्याची दगदग न होता घरबसल्या मुलाखत घेणे शक्य होईल. जिल्हा, परराज्यातील किंवा विदेशातील नातेवाईक यांना घरुन मुलाखत घेता येत असल्यामुळे त्यांचा होणारा त्रास कमी होणार आहे.  तसेच प्रत्यक्ष कारागृहात मुलाखतीकरीता येणारे नातेवाईक व वकील यांची संख्या कमी होऊन प्रशासनाला मदत होणार आहे.

हेही वाचा >>>बुलढाणा: सासुरवाडीला गेला अन अनर्थ झाला! केवळ मोबाईलसाठी…

 खिडकी योजना कायम

यापुर्वी बंद्यांचे कारागृहातील प्रत्यक्ष मुलाखतीकरीता चार खिडक्या उपलब्ध होत्या. आता जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नव्याने मुलाखत कक्ष बांधण्यात आलेला असून यात दहा खिडक्यांद्वारे बंदी त्यांचे नातेवाईक व वकील यांचेशी प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. तसेच कारागृह प्रशासनाकडून बंद्यासाठी दूरध्वनी सुविधाही उपलब्ध करुन देण्यात आले आहे.बंद्यांच्या नातेवाईकांचे ‘व्हेरीफाईड मोबाईल’ क्रमांकावर संपर्क साधू शकतात. कारागृहात असलेले विदेशी बंदी, कारागृहातील भारतीय बंदी ज्यांचे नातेवाईक विदेशात राहतात त्यांच्यासह सर्व बंद्यांना या सुविधेचा लाभ मिळतो. सद्यस्थितीत पाकीस्तानी बंद्यांना हि सुविधा लागू नाही.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E mulakat facility for communication with family in buldhana jail scm 61 amy