बॅटरी हा प्रकार सर्वाधिक घातक; नागपूरकरांमध्ये जनजागृतीचा अभाव
भ्रमणध्वनी, संगणक या आवश्यक आणि गरजेच्या वस्तू असल्या तरी त्याचा वापर झाल्यानंतर त्या पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत. शहरातून निघणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील बॅटरी हा प्रकार सर्वाधिक घातक ठरत आहे. मात्र, त्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापरासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. त्यामुळे शहराचे पर्यावरण मजबूत होण्याऐवजी ढासळतच चालले आहे. नागरिकांमध्येही ई-कचरा आणि त्याच्या दुष्परिणामाविषयी जनजागृतीचा अभाव आहे.
घनकचरा, जैववैद्यकीय कचऱ्याचे जाळे शहरात प्रचंड वाढले आहे. संबंधित प्रशासकीय यंत्रणा त्याच्या नियोजनात अपयशी ठरली असतानाच ई-कचऱ्याने डोके वर काढले आहे. शहरातला सर्व कचरा भांडेवाडीच्या कचराघरात जातो हे सर्वानाच ठाऊक आहे. यातील मोजक्याच कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि उर्वरित कचरा शहराच्या पर्यावरणावर वाईट परिणाम करीत आहेत. या उपकरणात आर्सेनिक, लिथियम, शिसे, पारा, कॅडमियम, निकेल यासारखे धातू वापरले जातात. त्यातून पॉलिक्लिरिनेटेड डायफोनाइल्स, पॉलिब्रोमिनेटेड, क्लोरोक्युरोकार्बन यासारखे घातक रासायनिक पदार्थ हवेत मिसळतात. ते पर्यावरण आणि परिणामी मानवी आरोग्यासाठी घातक ठरत आहेत. याबाबत महापालिका अद्याप शांत असली तरी एका सामाजिक संस्थेने मात्र त्यासाठी पुढाकार घेतला आहे. मैत्री परिवारचे सदस्य मकरंद पांढरीपांडे आणि त्यांची कन्या जुईली पांढरीपांडे यांनी दोन वर्षांपूर्वी मकरसंक्रांतीच्या दिवशीच ई-कचरा संकलन करण्यास सुरुवात केली. त्यावेळी एका दिवसात त्यांनी १५० किलो ई-कचरा गोळा केला. एमआयडीसी परिसरात सुरीटेक इंडस्ट्री येथे एका वाहनातून हा कचरा पोहोचवला जातो. त्याठिकाणी या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. दोन वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमात तत्कालीन जिल्हाधिकारी ते तत्कालीन पोलीस आयुक्त सहभागी झाले होते. उपक्रमाच्या शुभारंभातच पोलीस विभागातून तब्बल ३०० ते ४०० किलो ई-कचरा गोळा करण्यात आला. त्यामुळे इतर सरकारी कार्यालयात ई-कचऱ्याची संख्या किती असेल याचा अंदाज घेता येऊ शकतो. मात्र, सरकारी कार्यालयातून हा कचरा गोळा करताना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. विविध कंपन्यांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे आता स्वस्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्येही वापरा आणि फेका ही वृत्ती वाढत आहे. ई-कचरा वाढण्यासाठी ही वृत्तीही कारणीभूत ठरत आहे.
पॉवरपॉईंट सादरीकरणातून माहिती
ई-कचऱ्याविषयी अजूनही लोकांमध्ये जागृती नाही. ते थेट कचऱ्याच्या डब्यात टाकून देतात. मात्र, यातला बॅटरी हा प्रकार अतिशय धोकादायक आहे. ती कचऱ्यात टाकली तर कधीही स्फोट होऊ शकतो. शहरात लोकांना हे समजावून सांगणे सुरुवातीला खूप कठीण गेले. आम्ही ठिकठिकाणी लोकांना पॉवरपॉईंट सादरीकरणातून ई-कचऱ्याची माहिती देतो. या कार्याला आता थोडेफार यश येत आहे. – मकरंद पांढरीपांडे
- भारतातील ई कचऱ्याचे प्रमाण प्रतिवर्ष – ४ लाख ७० हजार टन
- शीतकपाट – १ लाख टन
- दूरचित्रवाणी – २ लाख ७५ हजार टन
- संगणक – ६० हजार टन
- प्रिंटर – ५ हजार टन
- भ्रमणध्वनी – १ हजार ७०० टन